सातारा : रात्रीत २१ बंद घरे फोडली, जावलीतील आठ गावांतील प्रकार | पुढारी

सातारा : रात्रीत २१ बंद घरे फोडली, जावलीतील आठ गावांतील प्रकार

मेढा : पुढारी वृत्तसेवा
जावली तालुक्यातील आठ गावांतील तब्बल 21 घरे चोरट्यांनी फोडली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेढा पोलिसांनी श्‍वान पथकाला पाचारण केले आहे तर चोरंबे गावातील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाल्याची माहिती समोर आली आहे.

करंजे, सावली, आसणी, भोगवली, पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी व वरोशी या 8 गावांतील एकूण 21 बंद घरे चोरट्यांनी फोडली आहेत. मध्यरात्रीच्या दरम्यान ही घरे फोडली आहेत. तर, चोरांबे येथे चोरीचा प्रयत्न फसून गावातील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. शुक्रवारी सकाळी सातच्या दरम्यान याची खबर मेढा पोलिसांना लागताच सपोनि अमोल माने यांनी घटनास्थळी भेटी देऊन तपास गतीमान केला. तपासाकामी श्वान पथकासही पाचारण केले आहे. चोरट्यांनी करंजेत दोन घरे, सावलीत दोन घरे, आसणीत आठ घरे, भोगवलीत दोन घरे, पुनवडी येथे एक घर, केडंबेत तीन, वाळंजवाडीत एक व वरोशीत एक घर अशी 21 घरे एका रात्रीत फोडली आहेत. या घरफोड्यांमध्ये कोणाचे किती नुकसान झाले? हे नेमके समजू शकले नाही. या चोर्‍यांमुळे पश्चिम जावलीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जावलीत एकाच वेळी 21 घरफोड्या होण्याची ही मोठी घटना आहे. चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केले असले तरी त्यांचे टाळे तोडणे,घरातील तिजोरी फोडणे यासाठी त्यांनी अत्याधुनिक साहित्याचा वापर केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Back to top button