मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई मध्यवर्ती जिल्हा बँकेप्रमाणे कोल्हापूर, पुणे, सांगली या प्रमुख जिल्हा बँकांसह राज्यातील सर्व मध्यवर्ती जिल्हा बँकांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
मुंबई बँक नफ्यामध्ये आहे. तरीही राजकीय सूड उगवण्यासाठी या बँकेकडे पाहिले जात आहे. मुंबई बँकेची याआधीही चौकशी झाली आहे. आता इतर जिल्हा मध्यवर्ती बँकांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका दरेकर यांनी मांडली.
ते म्हणाले, मुंबई बँकेचा मी 10 वर्षे चेअरमन होतो. नाबार्डने एनपीए, सीआरएआर, प्रॉफिट रेशो याचा उत्तम अभ्यास करून मुंबई बँकेला गौरवान्वित केले आहे. आता मात्र मुंबई बँकेत 2,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे.
15 कोटींचा नफा कमावणारी मुंबई बँक 2 हजार कोटींचा घोटाळा कुठून करणार? न्याय दरबारी सत्य-असत्य समोर येईल. मात्र, हे बिनबुडाचे आरोप करणारे धनंजय शिंदे, काँग्रेसचे नाना पटोले, भाई जगताप यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करणार आहोत. या नेत्यांच्या नौटंकीला आपण काडीचीही किंमत देत नाही, असेही दरेकर म्हणाले.