कराड : पिता-पुत्राकडून आत्महत्येचा प्रयत्न; पित्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू | पुढारी

कराड : पिता-पुत्राकडून आत्महत्येचा प्रयत्न; पित्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू

कराड : पुढारी वृत्तसेवा
खळे (ता. पाटण) येथील पिता – पुत्राने विषारी औषध प्रशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येच्या प्रयत्नानंतर उपचारावेळी वडिलांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. तर मुलगा अत्यवस्थ आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी 6 ते 8.30 वाजण्याच्या सुमारास खळे येथील सुभाष नाना कचरे (वय 62) व त्यांचा मुलगा शिवाजी सुभाष कचरे (वय 40) या दोघांनी शेतामध्ये जाऊन विषारी औषध पिले. त्यानंतर त्यांना कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारावेळी शुक्रवारी मध्यरात्री पित्याचा मृत्यू झाला. तर शिवाजी कचरे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी सायंकाळी सुभाष कचरे आणि त्यांचा मुलगा हे दोघे एकत्र सायंकाळी साडेपाच वाजता शेतामध्ये गेल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले. ते दोघे रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घरी परत न आल्याचे पाहून घरातील सदस्यांनी काळजीपोटी गावातील काही ग्रामस्थांना त्यांचा शोध घेण्यास सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी त्वरित शोध सुरू केला. त्यानंतर शिवाजी कचरे आणि सुभाष कचरे शेतामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. दरम्यान, या घटनेचे कारण समजू शकलेले नाही.सुभाष कचरे यांनी एसटी महामंडळामध्ये कंडक्टर म्हणून सेवा बजावली होती. सेवानिवृत्त झाल्यापासून त्यांनी पूर्णपणे शेतीवर लक्ष दिले होते. त्यांना त्यांचा मुलगा शिवाजी याची चांगली साथ लाभली होती. गावातील प्रगतशील शेतकरी म्हणून या दोघांकडे पाहिले जात
होते.

Back to top button