‘भाजपचा खासदार निवडून आणला,आता आठही मतदारसंघांतून आमदार निवडून येतील’ | पुढारी

'भाजपचा खासदार निवडून आणला,आता आठही मतदारसंघांतून आमदार निवडून येतील'

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेल्या माढा मतदारसंघातून भाजपचा खासदार निवडून आणला. आता जिल्ह्यातील आठही मतदारसंघांतून भाजपचे आमदार निवडून येऊ शकतात. सातारच्या दोन्ही राजांना सोबत घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन पक्ष संघटन वाढवणार आहे. पुढील 8-15 दिवसांत जिल्ह्यातील 75 टक्के काँग्रेस भाजपमध्ये दिसेल, असा इरादा भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्‍त केला.

आ. जयकुमार गोरे यांची भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमास खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, सौ. सोनिया गोरे, पिंपरी-चिंचवडचे सदाशिव खाडे, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, प्रदेश उपाध्यक्षा सौ. सुवर्णा पाटील, ओबीसी सेलचे करण पोरे, महिला जिल्हाध्यक्षा सुरभि भोसले, जयकुमार शिंदे, सुनील काटकर, अ‍ॅड. डी. जी. बनकर, अरुण गोरे, भरत पाटील प्रमुख उपस्थित होते.

आ. जयकुमार गोरे म्हणाले, दोन्हीही राजांना सोबत घेऊन काम करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. दोघांमध्येही प्रचंड क्षमता आहे. शरद पवारांच्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार होऊ शकतो याची आपण कल्पनाही केली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांतून भाजप आमदार निवडून आणणे अशक्य नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना सर्वांची साथ हवी आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप पक्ष उतरला असता तर

राष्ट्रवादीचे दोन-पाच संचालक झाले असते. बाकी सर्व संचालक भाजपचे झाले असते. सहकारातील निवडणुका होत्या. या निवडणुका आपापल्या विचाराने लढू असे शिवेंद्रराजेंनी सांगितले. आम्ही सर्वजण एकत्र आलो तर भाजपला थांबवण्याची ताकद दुसर्‍या कुठल्याही पक्षात नाही. प्रत्येक तालुक्यात संघटनात्मक बांधणी करुन नव्या लोकांना सहभागी करुन घेऊया. आगामी 8-15 दिवसांत जिल्ह्यातील 75 टक्के कॉ्रंग्रेस भाजपमध्ये आलेली पहायला मिळेल. भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांवर कसलाही अन्याय होवू देणार नाही. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून जो तुमच्या नादाला लागेल त्याचा नाद पूर्ण करणार. पण कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करणे आवश्यक आहे.

आ. शिवेंद्रराजे आणि मी एकाच विचाराने आहोत. शिवेंद्रराजे चेअरमन नसते तर जिल्हा बँक नीट चालली नसती. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना चूक होवू शकते. पण मनात काहीही न ठेवता सुचना कराव्यात. सुधारणा केल्या जातील. संघटना सोबत हवी. एकत्र काम करु, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्‍त केल्या.

आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, आगामी निवडणुका आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असून नक्‍की यश मिळेल. पदाधिकारी बदल अचानक नसून वरिष्ठ नेत्यांनी विचारपूर्वक त्याबाबत निर्णय घेतला. शासनाकडून साजेशे निर्णय घेतले जात नसल्याने लोकांच्या मनात प्रचंड चीड आहे. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे त्यांच्यात एकमत नाही. लोकांच्या मनातील नाराजी व्यक्‍त करायला हवी. जिल्ह्यात भाजपला उज्ज्वल भवितव्य आहे. सर्व तालुक्यात भाजपाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. मावळत्या जिल्हाध्यक्षांनी जिल्ह्याची नाळ तुटून देवू नये. आ. गोरे यांचे संघर्षातून निर्माण झालेले नेतृत्व आहे. राजकारणात कुठला डाव कधी टाकायचा हे त्यांना चांगलं कळतं. म्हणून माणच्या राजकारणात ते टिकू शकले. त्यांनी ते करुन दाखवलं, असेही त्यांनी सांगितले.

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, भाजप पक्षाने गांभीर्याने विचार करुन जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी जयकुमार गोरे यांच्यावर सोपवली आहे. भाजपची टीम आवेशाने लढत असताना त्यांना आ. गोरे यांचे आक्रमक नेतृत्व लाभले आहे. याचे परिणाम आमागी निवडणुकांमध्ये पहायला मिळणार आहे. कुणाचीही सत्‍ता असली तरी कार्यकर्त्यांना घाबरण्याचे कारण नाही, असे सांगितले.

विक्रम पावसकर म्हणाले, सर्व आमदार, खासदार भाजपमधून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करुया. जयकुमार गोरे यांच्या खांद्याला खांदा लावून सर्वांनी काम करावे.

सुवर्णा पाटील म्हणाल्या, जयकुमार गोरे यांची सर्वसामान्यांचा नेता, पाणीदार नेता अशी ओळख आहे. त्यांच्याकडे नेतृत्वगुण आहे. पक्षसंघटनेत महिलांचा सहभाग वाढला आहे. आमागी निवडणुकीत महिलांना संधी मिळेल, असे सांगितले. दरम्यान, सदाशिवराव खाडे, सुरभी भोसले यांनीही मनोगत व्यक्‍त केले. यावेळी विजय धट, किरण बर्गे, निलेश माने, धनंजय जांभळे, मिलिंद काकडे, अनुप सूर्यवंशी, विठ्ठल बलशेटवार, प्रशांत खामकर, सुनेशा शहा, निलेश शहा, विकास गोसावी, दत्‍ताजी थोरात, किशोर गोडबोले उपस्थित होते.

Back to top button