बावधनची बगाड यात्रा : प्राचीन परंपरेचा ठेवा | पुढारी

बावधनची बगाड यात्रा : प्राचीन परंपरेचा ठेवा

धनंजय घोडके : 

बावधनची बगाड यात्रा मंगळवार दि. 22 मार्च 2022 रोजी असून यावर्षी बगाड्या होण्याचा मान बाळासाहेब मांढरे, शेलारवाडी यांना मिळाला आहे. त्यांच्या बहिणीला अपत्य प्राप्ती व्हावी यासाठी त्यांनी नाथ चरणी नवस लावला होता, तो पूर्ण झाल्याने गेली 18 वर्षे ते नवस लावण्यासाठी बसत होते. होळी पौर्णिमेला बगाड्याचा मान मिळवण्यासाठी 48 जण कौल लावण्यासाठी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब हणमंत मांढरे यांचा कौल लागल्याने त्यांना बगाड्या होण्याचा मान मिळाला. या बगाड यात्रेविषयी…

छ. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या बावधन गावाला पौराणिक, ऐतिहासिक महत्त्व आहे. इथला सोनजाई डोंगर म्हणजे नाथ सांप्रदायाचे महत्वाचे स्थान! याच डोंगरावर मच्छिंद्रनाथांनी सोन्याची विट आणून ओझर्डे येथील सोनेश्वर डोहात फेकून दिली होती, अशी आख्यायिका आहे. सोनजाई डोंगराच्या दक्षिण बाजूला देऊळ परिसर आहे. याच ठिकाणी दक्षिणेतील दु:खाचा नयनाट करण्यासाठी स्वत: भगवान शंकर ‘भैरवनाथाच्या’ अवतारात प्रगट झाल्याची आख्यायिका आजही भक्‍तिभावाने सांगितली जाते. याच भैरवनाथाचं सुरेख दक्षिणाभिमुखी मंदिर गावात आहे. आकर्षक दीपमाळा, सागवानी लाकडावर कोरलेली नक्षीदार वेलबुट्टी, झुंबरे आदी वस्तू मंदिराचं वैभव खुलवतात. दगडाच्या गाभार्‍यात भैरवनाथ आणि माता जोगुबाईची सुंदर मूर्ती आहे. बावधन ग्रामस्थांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. फाल्गुन वद्य चतुर्थी, पंचमी आणि षष्ठी हे भैरवनाथाच्या यात्रेचे तीन मुख्य दिवस.

‘बगाड’ हे या यात्रेचं मुख्य आकर्षण. ओझर्डे गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या तिरावर असलेले ‘सोनेश्वराचे मंदिर’ 18 व्या शतकात पिसाळ देशमुखांनी बांधले आहे. श्री शंकराची आकर्षक पिंड येथे असून पिंडीसमोरील नंदीच्या गळ्यात बगाड्याची प्रतिकृती आहे. सुमारे 350 वर्षांपासून बगाड यात्रेस सुरुवात झाली. होळी पौर्णिमेला भैरवनाथाच्या मंदिरात ‘नवसकार्याचा’ कौल लावला जातो. उजवा कौल ज्याचा तो ‘बगाड्या’ ठरतो. यात्रेच्या मुख्य दिवसापर्यंत बगाड्या भैरवनाथाच्या मंदिरातच राहतो. होळी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत बगाड्याचा उपवास असतो. बगाडाचा रथही वैशिष्ट्यपूर्ण असतो. गावच्या थोरल्या विहिरीतील बगाडाचे खांब, कणा, बोटले रथासाठी वाजतगाजत मंदिरासमोर आणतात. बगाडाचा रथ तयार करणे हाही यात्रेचाच भाग आहे. या रथाला दोन मोठी दगडी चाके असतात. 10 फूट लांबीच्या कण्याला 18 फूट उंच वाघाचे तोंड असलेले खांब जोडून त्यावर 40 फूट उंच बांबूंचे शीड विशिष्ट कोनात बांधले जाते. शीडाच्या टोकाला झोपाळा असतो. त्यावर लोखंडी गळात बगाड्याला टांगले जाते.

चतुर्थीला गावात छबिना निघतो. देवाच्या पालखीसमोर ढोल, लेझिम, सनई, दांडपट्टा असे विविध खेळ सादर केले जातात. पंचमीच्या पहाटे पालखीबरोबरच बगाड्या सोनेश्वराच्या मंदिराजवळ पोहोचतो. कृष्णा नदीत स्नान करून सोनेश्वराला नैवेद्य अर्पण करून, कृष्णामाईची ओटी भरून बगाड्याला शीडावर टांगले जाते. ‘काशीनाथाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात बगाड मिरवणुकीस सुरुवात होते. नांगरट केलेल्या जमिनीतून बगाडाचा रथ धावत असला तरी बगाड्याला विशिष्टरीत्या बांधल्यामुळे त्याला त्रास होत नाही. हा रथ ओढण्यासाठी 6 बैलजोड्या असतात. यात्रेसाठी खास रतीब देऊन बैल बनवले जातात. कसलेले खिल्लारी बैल हा गाडा ओढतात. 4 कि. मी. अंतराच्या या बगाड यात्रेत अबालवृद्ध, स्त्री-पुरुष भक्‍तिभावाने सामील होतात. जेथे बगाड रुतून बसते तेथे गोमुत्र शिंपडून गोल रिंगण घेतले जाते. गावात प्रवेश होताच ‘रिंगण’ घेतले जाते.

येथे अभूतपूर्व सोहळा पहावयास मिळतो. नंतर बगाड भैरवनाथासमोर पोहोचते. येथे बगाड्याला खाली उतरवून देवाचा प्रसाद दिला जातो.
बावधनच्या बगाडाची कीर्ती महाराष्ट्रभर आहे. लाखो भाविक यात्रेस येतात. बावधनसह बारा वाड्यातील ग्रामस्थ उत्सवात सहभागी होतात. नवस पूर्ण झालेले भाविक बगाडास गोंडे बांधतात. ‘काशीनाथाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात बगाडाची सांगता होते. बावधन बगाडाची यात्रा आपल्या वेगळेपणामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे. बगाडाचा गाडा किंवा रथ, त्याचे शीड, गळाला टांगलेला बगाड्या, गाडा ओढणारे बैल, खडतर रस्ता, बगाड्याचा पोषाख, त्याची व्रत वैकल्ये याची सर्वत्र चर्चा होत असते.

बावधन ग्रामस्थांच्या एकीचे प्रकर्षाने दर्शन या यात्रेत घडते. सारे गाव यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असते. ‘काशीनाथाचं चांगभलं’ म्हणत प्रत्येक गोष्ट होत असते. या गजरात इतकी प्रचंड शक्ती व प्रेरणा स्त्रोत आहे की, मोठमोठे बांबू, शिडाची घडण आदी अवजड कामे केवळ सांघिक शक्तीतून सहजपणे पार पडतात. बगाडावरील पिसाळ-भोसले मानकरी, बैल जुपणारे मानकरी, शिडाला तेल घालणारी व्यक्ती, सर्व बलुतेदार आपापली भूमिका चोखपणे पार पाडतात. ही यात्रा आपल्या एकोप्याने इतर गावांनाही एकात्मता शिकवते…

– धनंजय घोडके, वाई

Back to top button