रंगपंचमी : आज रंगारंग; करू नका बेरंग

Rangpanchami
Rangpanchami

सातारा : पुढारी वृत्तसेवा 

मागील दोन वर्षांपासून निर्बंधांच्या जोखडात अडकलेलेे सण समारंभ यावर्षी मात्र खुलेपणाने साजरे होत आहेत. रंगपंचमीचा बेरंग होऊ नये, याची काळजी घेणेही गरजेचे असून मंगळवारी योगायोगाने जागतिक जल दिन आहे. त्यामुळे या दिवशी तरी पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. बालचमुंसह लहानथोरांची रंगपंचमीची तयारी धुलवडीपासून सुरू झाली. त्यामुळे बाजारपेठेसह अवघ्या जनजीवनावर रंगपंचमीचा फीव्हर पसरला आहे. रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. दरम्यान, नैसर्गिक रंगांच्या वापराबाबत जनजागृती होत असल्याने असेच रंग खरेदीला नागरिकांमधून प्राधान्य दिले जात आहे.

फॅन्सी व कार्टुनच्या आकारातील पिचकार्‍या

सण समारंभ साजरे करण्यामागे संस्कार आणि संस्कृती जोपासणे हे मुख्य कारण असते. या परंपरांचे एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरण होत असते. परंतु, आता या सणांना उत्सवाचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. पूर्वी होळीच्या पाचव्या दिवशी रंगशिपणे केले जाते. परंतु, आता होळी व धुलवडीपासूनच रंगपंचमीच्या रंग उधळणीला सुरुवात होत आहे. मात्र, ऐन उत्सवाची रंगत काही न्यारीच असते. मंगळवार दि.22 रोजी सर्वत्र रंगपंचमी साजरी होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सातारा शहरासह जिल्ह्यातील बाजरपेठेत रंगपंचमीचा फीव्हर पसरला आहे. सातारा शहरातील बाजारपेठ नैसर्गिक व रासायनिक रंग, फॅन्सी तसेच प्राणी, पक्षी व कार्टुनच्या आकारातील पिचकार्‍यांनी सजली आहे. तरुणाई व बालचमुंकडून रंग व पिचकार्‍यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. त्यातून बाजारपेठेत उलाढाल वाढली आहे.

ठिकठिकाणी रंगोत्सव कार्यक्रमांचे आयोजन

गीत-संगीतीच्या तालावर धुंद होत रंग खेळण्यासाठी तरुणाई नेहमीच आसुसलेली असते. यावर्षीदेखील जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित रंगोत्सवांचे तरुणाईसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत. त्यातच आगामी काळात होणार्‍या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेकांकडून रंगपंचमीनिमित्त रंगोत्सव कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे रंगोत्सवामध्ये देखील राजकीय रंग पाहायला मिळणार आहेत.

साजरा करा पर्यावरणपूरक सण

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील दोन वर्ष कोरोना निर्बंधाच्या जोखडात अडकले होते. मात्र यावर्षी सर्व निर्बंध हटल्याने रंगपंचमीचा उत्साह वाढला असून रंगपंचमीच्या साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. रंगपंचमीला वापरल्या रासायनिक रंगांच्या दुष्परिणामांमुळे उत्साहाच्या आनंदावर विरजन पडते. त्यामुळे नैसर्गिक रंगाचांच वापर करावा, याबाबत विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्या वतीने मागील काही दिवसांपासून जनजागृती केली जात आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोरड्या रंगांनी रंगपंचमी खेळण्याबाबत आवाहन केले जात आहे. काहींनी तर पर्यावरणपूरक सण साजरा करण्याबाबत स्मरणपत्र मोहीम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news