सातारा : नेले येथे दोन एकर उसासह कडबा जळून खाक | पुढारी

सातारा : नेले येथे दोन एकर उसासह कडबा जळून खाक

कण्हेर, पुढारी वृत्तसेवा : नेले (ता.सातारा) येथे अज्ञातांकडून दोन एकर खोडवा उसासह ज्वारीच्या कडब्याची गंज जाळण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञाताविरोधात तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर संबंधितांवर कडक कारवाईची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेले गावच्या उत्तरेकडे असलेल्या मुळाचा माळ या शेतालगत असलेल्या ओढ्यात अज्ञाताने आग लावली होती. ही आग गवतामुळे झपाट्याने ओढ्याच्या दोन्ही बाजूस पसरून उसाच्या शेतीला लागली. यामध्ये आनंदराव श्रीरंग जाधव व विजय गुलाब जाधव यांच्या अनुक्रमे दीड व पाऊण एकर असा एकूण सव्वा दोन एकर उसाला आग लागून शेतातील पाईंपलाईनसहित ऊस जळून खाक झाला आहे.  शेजारीच असलेल्या संजय फडतरे यांच्या १ हजार ज्वारीच्या कडब्याला आग लागून तो सुद्धा जळून खाक झाला. यामध्ये तिन्ही शेतकऱ्यांचे सुमारे २ ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने क्षणातच सर्वकाही जळून खाक झाले होते. पोलिसांनी संबंधित घटनास्थळाचा पंचनामा केला. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय देशमाने करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

 

 

Back to top button