

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील पदपथ व सायकल ट्रॅकवरवरील टपर्या, हातगाड्या व विक्रेत्यांवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकांच्या वतीने कारवाई केली जात आहे; तसेच पदपथांवर उभ्या केलेल्या वाहनांवरही धडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता विनाअडथळा पदपथांवरून चालता येणार आहे.
याबाबतचे आदेश आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी अतिक्रमण निरीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच पादचार्यांना अतिक्रमणमुक्त पदपथ चालण्यासाठी उपलब्ध होतील, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.
शहरातील पदपथ व सायकल ट्रॅक नागरिकांना वापर करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत; मात्र शहरातील पदपथ व सायकल ट्रॅकवर टपर्या, हातगाडी व पथारीवाले विक्री करत बसतात.
खाद्यपदार्थ विक्रेते टेबल व खुर्च्या टाकून ठेवतात. दुकानदार फि—ज, साहित्य व फलक पदपथांवरच ठेवतात. काही दुकानदार पदपथ स्वमालकीचा म्हणून त्यांचा ओटा म्हणून सर्रासपणे वापर करतात.
त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. पदपथावर नागरिक अनधिकृतपणे वाहने पार्क करतात. पादचार्यांसाठी नाईलास्तव रस्त्यावरून ये-जा करावी लागते. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत.
महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 208 नुसार बेशिस्तपणे लावलेली वाहने ओढून नेण्याची किंवा त्यांचे स्थलांतर आणि कलम 243 अ (1) नुसार अशी वाहने योग्य जागी ठेवण्यात येतील.
शुल्क आकारण्यास आयुक्तांना अधिकार आहेत. महापालिका अधिनियम कलम 392(1) अन्वये वरील कलम 243 अ (1) व कलम 208 मधील तरतुदींचे उल्लंघन किंवा अनुपालन करण्यात कसूर केल्याप्रकरणी अशा प्रत्येक अपराधाबद्दल दंडाची शिक्षा करण्याचा अधिकार आयुक्तांना आहे. त्यानुसार आयुक्तांनी धडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर दुसर्या दिवशी पुन्हा अतिक्रमण केले जाते. असे चित्र शहरात सर्वत्र दिसत आहे.
त्यामुळे कारवाई करूनही काही फायदा होत नसल्याचे चित्र आहे. कारवाई केल्यानंतर विक्रेते व फेरीवाले पुन्हा आपले बस्तान मांडतात. त्याकडे अतिक्रमण विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
पदपथावरच महापालिकेच्या वतीने नामफलक, सूचनाफलक तसेच, बसथांबे, दिव्यांचे खांब उभारले जातात. महावितरणने डीपी बॉक्स बसविले आहेत. काही ठिकाणी बसण्यासाठी बाके, कठडे आहेत. तसेच, रोपांच्या कुंड्या ठेवल्या आहेत. वाहने जाऊ नये म्हणून बोलॉर्ड (क्रॉकीटचे लांब कठडे) लावले जातात.
अंतर्गत रस्त्यावर, गल्लीत जाण्यासाठी किंवा चौक आल्यास पदपथ संपविला जातो. पदपथ एकसलग पातळीवर नाहीत. त्यामुळे विशेषत: ज्येष्ठ व लहान मुलांना पदपथावर चालताना गैरसोय होते.