

औरंगाबाद , पुढारी वृत्तसेवा : आगामी निवडणुकांत भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी एमआयएमने दाखविल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. 'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना तशी ऑफरच दिली आहे.
खासदार जलील यांच्या आईंचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच जलील यांची भेट घेऊन सांत्वन केले. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी राजकारणासह विविध विषयांवर चर्चा झाली. एमआयएममुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा घेत भाजप जिंकत असल्याचे मविआचे नेते म्हणतात; मग हा संशय दूर करायचा असेल, तर तुम्हीच आमच्याशी युती करा, अशी ऑफर आपण टोपे यांना दिल्याचे जलील यांनी सांगितले.
सर्व पक्षांना मुस्लिमांची मते हवी आहेत. पण एमआयएम मात्र सोबत नको आहे. या परिस्थितीत भाजपला पराभूत करण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करू, असेही जलील यांनी सांगितले. टोपे यांनी त्यावर उत्तर देण्याचे टाळले. एमआयएमच्या वतीने आम्ही आता ऑफर दिली आहे. मविआकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, तर ठीक नाही तर आमचे 'एकला चलो रे' सुरूच आहे, असेही जलील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट