कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : महाविकास आघाडी -भाजपमध्ये थेट लढत

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : महाविकास आघाडी -भाजपमध्ये थेट लढत

Published on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अखेर महाविकास आघाडीच्या जागेचा तिढा सुटला. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेचा काँग्रेसला पाठिंबा राहील. काँग्रेसकडून दिवंगत आ. चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्चित आहे. फक्त औपचारिक घोषणा तेवढी करायची आहे.

शुक्रवारी भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी जाहीर झाली. एकूणच कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, दुरंगी सामना होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट काटाजोड लढत होईल, असे स्पष्ट झाले आहे.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आ. चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने त्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. परिणामी, काँग्रेसच्या आमदारांचे निधन झाल्याने हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा म्हणून पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आग्रही होते.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा हा मतदारसंघ बालेकिल्ला असल्याने शिवसेनेला मिळावा, यासाठी ते प्रयत्नशील होते. तसेच क्षीरसागर यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव आदींनी काँग्रेसला जागा सोडली, तरी शिवसेनेचा मतदार काँग्रेसला मतदान करेल का? शिवसेनेच्या मतदानाचा भाजपला फायदा होईल, अशी भीती व्यक्त केली होती. त्यामुळेच मैत्रीपूर्ण लढण्याची शिवसेनेची मागणी होती. यासाठी दोन दिवस मुंबईत बैठकांचे सत्र सुरू होते.

पालकमंत्री पाटील, ग्रामविकासमंत्री मुश्रीफ, शिवसेना नेते व उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत, क्षीरसागर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख या बैठकांना उपस्थित होते. अखेर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कोर्टात उमेदवारीचा चेंडू गेल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी रणांगणात उतरेल, असे जाहीर केले.

यापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आला होता. त्या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवून हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला. त्यानंतर कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवाराबरोबर त्यांची लढत असेल. काँग्रेस व भाजपने वेगवेगळे मेळावे घेऊन आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

भाजप ताकदीने उतरणार

भाजपने या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचे ठरविले असून, त्याद़ृष्टीने त्यांचे नियोजन सुरू आहे. भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. यामध्ये सत्यजित कदम यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, अजित ठाणेकर, माणिक पाटील-चुयेकर यांच्यासह सहाजणांनी मुलाखती दिल्या होत्या. जाधव हे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांनी पक्षाच्या वतीने 2014 मध्ये विधानसभेची निवडणूकही लढविली आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी ते आग्रही होते. भाजपच्या राज्य पदाधिकार्‍यांनी कदम व जाधव यांची नावे भाजपच्या दिल्ली पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवली होती. अखेर रात्री दिल्लीहून कदम यांचे नाव जाहीर करण्यात आले.

राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गेल्या दोन वर्षांत कोल्हापूर शहरातील रंकाळासंवर्धन, रस्त्यांसह विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने महाविकास आघाडींतर्गत मैत्रीपूर्ण लढत व्हावी, यासाठी क्षीरसागर आग्रही होते. परंतु, काँग्रेसला जागा सोडण्याचा निर्णय झाल्याने क्षीरसागर नाराज झाल्याचे समजते. क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news