अवकाळी पावसाचे सावट; आभाळ काळवंडलं, शेतकरी धास्तावला

सातारा : पुढारी वृत्तसेवा
शेतकर्यांच्या कुंडलीतील पापग्रहांनी आपले छळण्याचे परंपरागत तंत्र काही बदललेले नाही. दर दोन-चार महिन्यांनी येणार्या नवनव्या संकटांनी शेतकर्यांना उद्ध्वस्त करण्याचा अजेंडा सुरूच आहे. अवकाळी संकटातून कसाबसा सावरू लागलेला जिल्ह्यातील शेतकरी गेल्या दोन दिवसांपासून काळवंडणार्या आभाळामुळे पुन्हा चिंतातूर झाला आहे. सध्या शेतामध्ये गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांच्या काढणीची कामे सुरू असून, पाऊस झाला तर पुन्हा उद्ध्वस्त होण्याची भिती शेतकर्यांना आहे. त्यामुळे ‘देवा आता तरी पाऊस नको ना’ अशी आर्त विनवणी केली जात आहे.
सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांचा अनेकदा हातातोंडाशी आलेला घास कधी अवकाळीने, कधी रोगाच्या प्रार्दुभावाने, कधी अतिवृष्टीने तर कधी दुष्काळाने हिरावून घेतला. शेतीचे व पिकांचे वारंवार होणारे अतोनात नुकसान शेतकर्यांच्या काळजावर डागण्या देवून जात असते. जिल्ह्यात रब्बी हंगामात हजारो हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, मका, सूर्यफूल, कांदे इत्यादी पिके घेतली जातात. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात स्ट्रॉबेरी मोठ्या क्षेत्रावर केली जाते. पूर्वोत्तर भागात फळपिके घेतली जातात. मात्र, जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे शेतकर्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. 22 जुलैला झालेल्या अतिवृष्टीने न भुतो न भविष्यती असे नुकसान झाले होते.
त्यातून पूर्णपणे कोलमडलेला शेतकरी उभा राहण्यासाठी धडपडत होता. तोच डिसेंबरमध्ये पुन्हा अवकाळीचा तडाखा बसला. त्यामध्ये ज्वारी, गव्हासह अनेक पिके भुईसपाट झाली होती. वादळी पावसामुळे ऊस लोळले होते. चिखल झाल्यामुळे ऊस तोडणीत व्यत्यय आला होता. त्यातच मजुरांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसानही झाले होते. शेतीमध्ये जादा पाणी झाल्यामुळे हरभर्यामध्ये मूळकूज होऊन घाटेआळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्याला आता अडीच ते तीन महिने झाले असताना पुन्हा आभाळाने तोंड वर काढले आहे.
गुरुवारी रात्रीपर्यंत पाऊस झाला नाही. पण, काळ्याकुट्ट होणार्या आभाळामुळे शेतकरी धास्तावला आहे. काहीही करून शेतातील कामे उरकण्यावर भर दिला जात आहे. गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांची काढणी, मळणी करून धान्य घरात कसे सुखरूप पोहोचेल यासाठी सार्यांचीच धडपड सुरू आहे.
कांदा ऐरणी शेकारणीसाठी लगबग
जिल्ह्यात माण, खटाव, खंडाळा-लोणंद, फलटण, कोरेगाव तालुके कांद्याचे आगार म्हणून ओळखले जातात. सध्या रब्बी हंगामातील कांदा काढणी होवूनही म्हणावा असा दर मिळत नसल्याने बहुतांश शेतकर्यांनी कांद्याची अद्याप विक्री केलेली नाही. साठवणूक केलेला कांदा साठवणुकीसाठी ऐरण लावून ठेवल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ हवामानामुळे अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. कांद्याची ऐरण भिजू नये यासाठी प्लास्टिक, पाचटाने शेकारून ठेवण्यासाठी कांदा उत्पादकांची लगबग सुरू आहे.
पावसाच्या सावटामुळे मळणीची धांदल…
मागील दोन वर्षे कोरोना काळात शेतकर्याला शेतीनेच तारले आहे. आवक बंद झाली तरी दोनवेळचा दाना-पाणी शेतात पिकल्याने मिळाला. सध्याही शाळू, गहू, हरभरा आदी पिकांची सुगी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिके पदरात पडली नाहीत. त्यामुळे सर्व भिस्त आता रब्बीतील पिकांवरच अवलंबून आहेत. त्यातच मागील दोन दिवसांपासून ढगाळ हवामान राहत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. हाता-तोंडाशी आलेली पिके मळणी करून धान्याची रास घरात आणण्यासाठी शेतकरी धडपडत आहे. मळणीची धांदल उडाली असून शेतकरी सहकुटुंब शेतात राबत असल्याचे चित्र सर्रास दिसत आहे.