सातारा : नारळाच्या फांदीसह ४० फूट खोल विहिरीत पडून मुलग्याचा मृत्यू | पुढारी

सातारा : नारळाच्या फांदीसह ४० फूट खोल विहिरीत पडून मुलग्याचा मृत्यू

कोरेगाव : पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव (ता. ल्हासुर्णे) येथे नवलाई देवी मंदिर परिसरालगत चिरका नावाच्या शेतशिवारातील भंडारे यांच्या शेतीलगत असणाऱ्या विहिरीत एक मुलगा नारळाच्या झाडाच्या फांदीसह ४० फूट खोल विहिरीत पडला. यानंतर अथक प्रयत्नानंतर त्याचा विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. प्रतीक लक्ष्मण भांडवले (वय १८) असे पाण्यात पडलेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कोरेगाव येथील चिरका नावाच्या शेतशिवारातील भंडारे यांच्या शेतीलगत असणाऱ्या विहिरीत नारळाच्या झाडावरून फांदीसह ४० फूट खोल विहिरीत प्रतीक भांडवले हा पडला. यानंतर पाण्यात पडल्याची माहिती प्रतीकच्या मित्राने गावकऱ्यांना दिली. यावेळी गावातील युवा वर्गासह ग्रामस्थांनी गावालगत असणाऱ्या विहिरीकडे धाव घेतली.

याच दरम्यान रात्री थ्रीफेज विद्युत पुरवठा बंद असल्याने गावातील युवा वर्गाने गाडीच्या लाईट लावून प्रकाशाची सोय करत पाण्यात शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र, रात्री अंधार असल्याने त्यांना यश आले नाही.

विहिरीला लागून काही अंतरावरून कॅनॉल गेल्याने विहीर पाण्याने भरलेली होती. त्यामुळे प्रतीकला शोधताना अडथळा येत होता. रात्री गावातील युवकांनी कोरेगाव येथून विहिरीतील पाणी उपसण्यासाठी चार ते पाच डिझेल इंजिन आणून पहाटेपासून पाणी उपासण्यास सुरुवात केली. सकाळी नऊच्या सुमारास पाणी कमी होताच मदत पथकाला प्रतीकचा मृतदेह सापडला.

यानंतर मदतकार्याने दोरखंडाच्या सहाय्याने त्याला वर काढले आहे. प्रतीक हा आई- वडिलांना एकूलता एक मुलगा होता. या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button