सातारा : आमदारकीसाठी जि.प. निवडणूक महत्वाची | पुढारी

सातारा : आमदारकीसाठी जि.प. निवडणूक महत्वाची

सातारा : पुढारी वृत्तसेवा; प्रारंभी नगरपालिका की जिल्हा परिषदेची निवडणुक होणार या चर्चा सुरू आहेत. तरीही जिल्हा परिषद निवडणूक महत्वाची आहे. कित्येक वर्षात ही सत्ता अबाधित राहिली आहे. राजकीय समीकरणे मांडत असताना आमदारकीसाठी जि.प. निवडणूक महत्वाची आहे. येऊ घातलेल्या दोन्ही निवडणूकाचे परिणाम आगामी काळातील निवडणुकांवर होणार असल्याने सर्वांनी आतापासूनच कामाला लागावे, असे प्रतिपादन ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील नगरसेवकांचा राष्ट्रवादीभवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी ना. रामराजे बोलत होते. यावेळी सभासद नोंदणीचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ.दीपक चव्हाण, दीपक पवार, सत्यजितसिंह पाटणकर, नितीन माने, प्रभाकर देशमुख, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला विकास आघाडीच्या समिंद्रा जाधव, वैशाली दाभाडे, संगीता साळुंखे, कृषी सभापती मंगेश धुमाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ना. रामराजे म्हणाले, मागील निवडणूकीत आ. शशिकांत शिंदे यांना अनुभव आला असून कोणीही गहाळ राहू नये. पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. आता निवडणुका वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत. यासाठी कार्यकर्ते महत्वाचे आहेत. त्यांचे संघटन मजबूत होण्यासाठी लक्ष द्यावे लागणार आहे. 1999 मध्ये काँग्रेसचे विलासराव उंडाळकर यांचा अपवाद सोडता सर्व आमदार हे राष्ट्रवादीचे होते. आता वातावरण बदलल असलं तरी संघटना मजबूत करणे महत्वाचे राहणार आहे.

खा. श्रीनिवास पाटील म्हणाले की, तिकीट देताना स्पर्धा असते त्यावेळी माणसांच्या चेहर्‍यावर थोडंफार काळजी असते. पण आज डोळ्यात काजळ आहे. 23 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे आजची सभासद नोंदणी ही बियाणं प्रमाणे आहे. हे बियाणं पेरताना चाड्यात टाकताना ते दर्जेदार असलं तर त्याची उगवणही चांगली होती. त्यामुळे सभासद नोंदणी करतानाही प्रत्येकाने काळजी घेणे हे राष्ट्रवादीसाठी हितावह राहणार आहे.

ना. बाळासाहेब पाटील म्हणाले की, नगरपंचायतीच्या निवडणुकात चांगलं यश मिळाल्याने आजचा सत्कार राष्ट्रवादीसाठी अभिमानास्पद बाब आहे. जिल्हा परिषद आरक्षण निश्‍चितीनंतर प्रत्यक्ष कामाला वेग येणार आहे. सभासद अभियानही महत्वाचे असल्याने त्यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.  ( आमदारकीसाठी जि.प. निवडणूक महत्वाची )

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, अनेक लोकं ही सोडून गेली. पण सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादी पक्ष आणि नेत्यांच्या पाठीमागे प्रामाणिकपणे उभा राहिला आहे. तालुका स्तरावर बैठका घेऊन त्यांना सूचना करुन सभासद नोंदणी करणे गरजेचे आहे. प्रारंभी जिल्ह्यातील नगरसेवकांचा सत्कार सोहळा आणि आ.मकरंद पाटील, शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन पध्दतीने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचलंत का? 

Back to top button