सातारा : कोंडवे येथील गाडे वाड्याला आग, घरातील साहित्य जळून नुकसान | पुढारी

सातारा : कोंडवे येथील गाडे वाड्याला आग, घरातील साहित्य जळून नुकसान

कण्हेर (जि. साताारा) : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यातील कोंडवे येथील पुरातन कालातील असलेल्या गाडे वाड्याला रात्री अचानक आग लागली. या आगीमध्ये वाड्यामधील तीन घरातील घरगुती साहित्य जळून गाडे कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले असून मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बुधवारी मध्यरात्री जुन्या काळातील लाकडाच्या असलेल्या गाडे वाड्याला अचानक आग लागली. आग लागल्याची चाहूल वाड्यामध्ये कुटुंबातील एक झोपलेल्या व्यक्तीस लागली असता सर्वत्र खळबळ उडाली. लाकडाच्या वाड्याने पेट घेतल्याने आगडोंब उडाला होता.

गावकऱ्यांनी दूरध्वनीवरून नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेबाबत कळविले. घटनास्थळी अग्निशामन दल दाखल होऊन अग्निशामन बंबाच्या सहाय्याने सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नातून आग विझवण्यात यश आले. आग विझवण्यासाठी गावकऱ्यांनीही मोठी धडपड केली होती. आगीत घरातील कपडे, धान्य,कपाट आदी साहित्य जळून रहिवाशाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या वाड्यात एका व्यक्ती शिवाय कोणीही राहवयास नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

वाड्याला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारी घरांना आगीची झळ लागून घरांचे तडे गेले. यामुळे काही प्रमाणात शेजारील घरांचे नुकसान झाले आहे. अचानक लागलेल्या आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

हे ही वाचलं का  

Back to top button