सातारा : फसवणुकीतील तीन कोटींची 24 वाहने जप्त | पुढारी

सातारा : फसवणुकीतील तीन कोटींची 24 वाहने जप्त

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातार्‍यातील फायनान्स कंपनीकडून कर्जावर घेतलेल्या ट्रकचे हप्ते थकल्यानंतर ते खरेदी करण्याच्या बहाण्याने मूळ मालकांची फसवणूक करणार्‍या टोळीचा सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) पर्दाफाश केला. गोवा, गुजरातसह महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांत या गुन्ह्याची व्याप्ती असून पोलिसांनी 2 कोटी 65 लाख रुपये किमतीचे ट्रक, बोलेरोसह टमटम अशी 24 वाहने जप्त करत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

उन्मेश उल्हास शिर्के (वय 48, रा. निरा, ता. पुरंदर, पुणे), अब्दुल कादिर मोहम्मद अली सय्यद (रा. सुपा, ता. पारनेर, अहमदनगर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. दरम्यान, याबाबतची माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

अधिक माहिती अशी, सातारा शहरातील इंडो स्टार कॅपिटल फायनान्स येथून सचिन बजरंग चव्हाण (रा. एकंबे, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांनी 10 टायर ट्रक कर्जाने घेतला होता. त्या ट्रकचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीकडे एजंट म्हणून काम करणार्‍याच्या ओळखीने चव्हाण यांचा ट्रक संशयित आरोपी उन्मेश शिर्के याला द्यायचे ठरले. संशयिताने थकीत हप्ते भरून ठराविक रक्कम चव्हाण यांना देऊन तो ट्रक चालवण्यास घेतला होता. मात्र, काही महिन्यांतच ट्रकचे हप्ते थकल्याने चव्हाण यांनी शिर्के याला हप्ते भरण्याबाबत सांगितले. मात्र, संशयिताने वारंवार टाळाटाळ करुन उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.

अखेर संशयिताने तक्रारदार यांना ‘पैसे भरत नाही व ट्रक देणार नाही’ असे म्हणत दमबाजी केली. दमदाटी व फसवणूक झाल्याने तक्रारदार यांनी तक्रारदार यांनी सातारा शहर पोलिस ठाणे गाठले व घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. डीबीच्या पथकाने याचा तपास करुन दोन्ही संशयितांना शिताफीने अटक केली. संशयितांकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर शहर पोलिस हादरुन गेले. संशयितांनी तब्बल 45 जणांना अशा पध्दतीने गंडा घातल्याची कबुली दिली.

गुन्ह्याची व्याप्ती पाहून डीबीच्या पथकाने तपासाचा फास आवळला व एक-एक करत वाहने जप्त करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या तपासामध्ये संशयितांनी सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, बुलढाणा, पनवेल, ठाणे, रायगड, सांगली, गोवा, गुजरात अशा विविध भागातील लोकांची याच पद्धतीने फसवणूक केल्याचे समोर आले. अशा प्रकारे पोलिसांनी 14 ट्रक, 7 टाटा मॅजिक (छोटा हत्ती), सुमो 1 अशी सुमारे 3 कोटी रुपयांची वाहने 4 वाहने जप्त केली आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील राज्यातील अशा प्रकारे ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी तात्काळ नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

एसपींकडून पथकाला 35 हजारांचे बक्षीस…

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पो.नि. भगवान निंबाळकर, पो.नि. वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे फौजदार समीर कदम, पोलिस हवालदार राहुल घाडगे, सुजित भोसले, दीपक इंगवले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, अरुण दगडे, संतोष कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, एसपी अजयकुमार बन्सल यांनी डीबीच्या पथकाच्या कारवाईचे कौतुक करत 35 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

Back to top button