सातारा : दरोड्यातील 5 जणांना अटक | पुढारी

सातारा : दरोड्यातील 5 जणांना अटक

सातारा : पुढारी वृत्तसेवा

शिवथर (ता. सातारा) गावच्या हद्दीत दरोडा टाकून लूटमार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) टोळीला अटक केली. गतवर्षी घडलेल्या या घटनेची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. सचिन गब्बर भोसले (रा. मालगाव, ता. जि. सातारा), हरिष पिताजी ऊर्फ मुतखड्या शिंदे (वय 26, रा. पणदरे म्हसोबावाडी, ता. बारामती, जि. पुणे), शेखर बाळू चव्हाण (रा. साखरवाडी, ता. फलटण), गणेश शिवाजी कोकरे (रा. पणदरे म्हसोबावाडी, ता.बारामती, जि. पुणे), माकशा रंगा काळे (रा.सुरुर, ता.वाई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अजित निकम यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 18 एप्रिल 2021 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिवथर गावच्या हद्दीत घडली होती. तक्रारदार अजित निकम हे त्यांच्या मित्रासोबत असताना मोटारसायकलवरून आलेल्या सहा अनोळखी युवकांनी तक्रारदार यांना कोयत्याच्या लाकडी मुठीने मारहाण केली. तसेच तक्रारदार यांच्या मित्राला हाताने मारहाण करून जबरदस्तीने त्यांच्याकडील 2 मोबाईल, 1 मनगटी घड्याळ, रोख 1 लाख 62 हजार रुपये असा एकुण 1 लाख 73 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तालुका पोलिसांचा तपास सुरु होता मात्र त्यांना त्यात यश येत नव्हते.

दुसरीकडे एलसीबीचे पथक देखील या गुन्ह्याचा तपास करत होते. तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे एलसीबीला धागादोरा लागल्यानंतर त्यांनी संशयितांची धरपकड केली. संशयितांना अटक केल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोन्हाडे, पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, फौजदार गणेश वाघ, मधुकर गुरव, मदन फाळके, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, पोलिस हवालदार कांतीलाल नवघणे, विश्वनाथ सपकाळ, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, अर्जुन शिरतोडे, गणेश कापरे, रोहित निकम, स्वप्निल दौंड, विशाल पवार, मयूर देशमुख, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, वैभव सावंत, केतन शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Back to top button