आंध्र प्रदेश मध्ये नामकरणाचा ट्रेंड | पुढारी

आंध्र प्रदेश मध्ये नामकरणाचा ट्रेंड

आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम जिल्ह्याच्या अरकू क्षेत्राला ‘सीताराम राजू जिल्हा’ असे नाव दिले आहे. अनंतपूर जिल्ह्याचे नाव बदलून ‘श्री सत्य साई’ असे केले आहे. तिरूपतीशिवाय आता श्री बालाजी देखील जिल्हा असणार आहे.

नाट्यमय घडामोडींत आंध्र प्रदेश सरकारने राज्यात नवीन 13 जिल्हे तयार करण्याची घोषणा केली. त्यानुसार आता राज्यात एकूण 26 नवीन जिल्हे अस्तित्वात येत आहेत. दुसरीकडे आंध्रात लोकसभेच्या केवळ 25 जागा आहेत. अशा स्थितीत नवीन जिल्हे हे केवळ राजकीय उद्देशातून तयार केले जात आहेत, असे लक्षात येते. मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी 2019 च्या निवडणुकीत नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे नवे जिल्हे हे केवळ आश्‍वासनाची पूर्तता म्हणूनच पाहता येईल. शेवटी सरकारी नोकरांची संख्या वाढवावी लागेल आणि करवाढ देखील करावी लागेल. दुसरीकडे या निर्णयामुळे राज्य प्रशासनाच्या यंत्रणेत सुधारणा होईल, असा दावा आंध्र प्रदेश सरकारने केला आहे.

नवी जिल्ह्यांची निर्मिती आणि काही जिल्ह्यांच्या नामकरणाने राज्यात राजकीय गोंधळ सुरू झाला आहे. जिल्ह्याला कोणते नाव द्यावे यावरून अनेक गट आणि समूह पुढे आले. श्रीकाकुलम शहर हे श्रीकाकुलम जिल्ह्याचे मुख्यालय बनले आहे. विजयनगरम जिल्ह्याची रचना देखील अशीच निश्‍चित केली आहे. तर विशाखापट्टणम जिल्ह्याच्या अरकू क्षेत्राला सीताराम राजू जिल्हा असे नाव दिले आहे. अनंतपूर जिल्ह्याचे नाव बदलून आता श्री सत्य साई असे केले आहे. पुट्टपर्थी हे सत्य साई जिल्ह्याचे मुख्यालय असणार आहे. तिरूपतीशिवाय आता श्री बालाजी देखील जिल्हा असणार आहे. नव्याने तयार होणार्‍या एका जिल्ह्याला स्वातंत्र्यसैनिक आणि महान कृषिमंत्री दिवंगत काकानी वेंकटरत्नम यांच्या स्मरणार्थ नाव द्यावे, अशी मागणी होत आहे. आता एनटीआर जिल्हा आणि वायएसआर कडप्पा जिल्हा देखील अस्तित्वात आणला आहे. या जिल्ह्यांना राज्याच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांचे नाव दिले आहे. याचा राजकीय फायदा मिळेल, असा विचार मुख्यमंत्र्यांकडून केला जात आहे. राज्यात नवीन जिल्ह्यांच्या नामकरणांची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यावरून अनेक प्रकारच्या मागण्यांना जोर धरू लागला आहे. कारण लोकांकडून नवनवीन नाव समोर येत आहेत. राष्ट्रीय ध्वज रचनाकार पिंगली वेंकय्या, भारताचे माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी, स्वातंत्र्यसैनिक कन्नेगंती हनुमंथू यांची नावे जिल्ह्यांना देण्याची मागणी होऊ लागली आहे. कृष्णा जिल्ह्यातील भाटलापेनरुमरी येथे जन्मलेले वेंकय्या यांनी ध्वजाची रचना केली. हा ध्वज 1 एप्रिल 1921 रोजी विजयवाडाच्या दौर्‍यावर आलेल्या महात्मा गांधी यांना भेट दिला. पुढे तोच भारताचा पहिला ध्वज झाला.

जगनमोहन रेड्डी यांची कामगिरी सुमार राहिली आहे. राज्याच्या नवीन राजधानीबाबत ठोस निर्णय न घेणे हे एक उदाहरण सांगता येईल. साहजिकच निवडणुकीतील आश्‍वासने पूर्ण करण्यासाठी आंध्र सरकार जिल्हा निर्मितीच्या माध्यमातून नवीन अध्याय जोडू इच्छित आहेत. अर्थात, शेजारील राज्य तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी अनेक जिल्हे तयार करून एक आदर्श उदाहरण कायम केले आहे. केसीआर राव यांनी निवडणुकीच्या अगोदरपासूनच नवीन जिल्ह्यांबाबत नागरिकांना सामावून घेतले, चर्चा केली आणि त्याचे सकारात्मक परिणाम पाहवयास मिळाले. आंध्रचा विचार केल्यास नवीन जिल्ह्याच्या निर्मितीने राज्याच्या शासकीय कारभारात सुधारणा होणार आहे का? असा खरा प्रश्‍न आहे. जेव्हा एखादा राजकीय नेता किमान सरकार आणि कमाल शासन याबाबत बोलत असेल तर अशा स्थितीत नवीन जिल्हे तयार करणे हे अगदी विपरीत मानले जाते. करदात्यांच्या जीवावर नवीन जिल्हे तयार करणे हे त्याचेच प्रतीक आहे.

– के. श्रीनिवासन

Back to top button