हनी ट्रॅप : शाहूपुरीतील महिलेसह दोघांना अटक | पुढारी

हनी ट्रॅप : शाहूपुरीतील महिलेसह दोघांना अटक

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : ‘हनी ट्रॅप’मध्ये गुंतवून तरुण व्यापार्‍याला ब्लॅकमेल करीत 3 लाखांची खंडणी वसूल करणार्‍या टोळीतील शाहूपुरी परिसरातील एका महिलेसह दोघांना राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या आहेत.

हिना सनाऊल्‍ला फकीर (वय 27, रा. आठवी गल्‍ली, शाहूपुरी) व अजित संभाजी निंबाळकर (27, सनगर गल्‍ली, कागल) अशी त्याची नावे आहेत. न्यायालयाने संशयिताना चार दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी टोळीतील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी दोघा संशयितांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक भगवान शिंदे यांच्याकडे गुन्ह्याचा तपास सोपविला आहे. शिंदे व पथकाने पसार झालेल्या हिना फकीरसह अजित शिंदे याना बेड्या ठोकून अटकेची कारवाई केली. अन्य एका संशयित महिलेसह दोघांना लवकरच अटक करण्यात येईल, असे भगवान शिंदे यांनी सांगितले.

शाहूपुरी येथील तरुण व्यापार्‍याला हनीट्रॅपमध्ये अडकावून संशयितांनी त्यास मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील काही हॉटेल्स, लॉजमध्ये नेऊन संशयास्पद स्थितीत चित्रीकरण केले. ब्लॅकमेल करीत 3 लाखांची खंडणी उकळण्यात आली. आणखी काही रकमेची मागणी करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. व्यापार्‍याने पोलिस अधीक्षक बलकवडे यांच्याकडे धाव घेऊन फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली आहे.

Back to top button