पाटण : राज्यमंत्री शंभूराज देसाईंना पाटणकरांचा मोठा धक्का; १७ पैकी १५ जागांवर राष्ट्रवादीचा विजय - पुढारी

पाटण : राज्यमंत्री शंभूराज देसाईंना पाटणकरांचा मोठा धक्का; १७ पैकी १५ जागांवर राष्ट्रवादीचा विजय

पाटण : पुढारी वृत्तसेवा : पाटण नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचे वर्चस्व पुन्हा एकदा निर्विवाद प्रस्थापित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पाटणकर गटाने १७ पैकी तब्बल १५ जागांवर यश मिळवले आहे. तर सेनेचे राज्याचे गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई गटाला अवघ्या दोन जागांवर यश मिळालेले आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेल्या ना. शंभूराज देसाई यांना येथे जबरदस्त धक्का देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांची जिल्हा बँकेनंतरची विजयाची अखंडित परंपरा यापुढेही कायम राहील, असा सर्व स्तरातून विश्वास व्यक्त केला जात आहे. भाजपा, काँग्रेस आणि अपक्ष बंडखोरांचाही येथे पराभव झाला.

पाटण येथील बाळासाहेब देसाई कॉलेजवर सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गटाच्या उमेदवारांच्या विजयाचे निकाल जाहीर होत होते. यात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पाटणकर गटाचे स्वप्निल माने (प्रभाग १), सौ. सुषमा गणेश मोरे (प्रभाग २), जगदीश शेंडे (प्रभाग ३), राजेंद्र राऊत (प्रभाग ४), सौ. संजना जवारी (प्रभाग ५), सागर पोतदार (प्रभाग ६), सौ. सोनम फुटाणे (प्रभाग ७), सौ. संज्योती जगताप (प्रभाग ८), संतोष चंद्रकांत पवार (प्रभाग ९), किशोर गायकवाड (प्रभाग १०), माजी उपनगराध्यक्ष सचिन कुंभार (प्रभाग ११), सौ.अनिता देवकांत (प्रभाग १२), सौ. मिनाज मोकाशी (प्रभाग १३), सौ. मंगल शंकर कांबळे (प्रभाग १६), उमेश टोळे (प्रभाग १७) हे पाटणकर गटाचे १५ उमेदवार निवडून आले.

सेनेच्या ना.देसाईंना अवघ्या दोन जागा

शिवसेना तथा राज्याचे गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई गटाचा चंचुप्रवेश लक्षात घेता अवघ्या २ जागांवर सेनेचे उमेदवार निवडून आले. त्यात प्रभाग १४ मधून सौ. आस्मा इनामदार आणि प्रभाग १५ मधून सौ. शैलजा पाटील या निवडून आल्या आहेत. निकाल जाहीर होताच उमेदवार आणि समर्थकांनी गुलालाची उधळण घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला. विजयी उमेदवारांनी आपले नेते, हितचिंतकांचे आशीर्वाद घेतले. विजयी उमेदवारांचे सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे .

निवडणुक निर्णय अधिकारी तथा कराडचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा पाटण नगरपंचायत मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी अतिशय शांततेत व सुरळीतपणे पार पडली. यावेळी पाटणचे पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.

Back to top button