

सातारा ; पुढारी वृत्तसेवा-असून कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने मांढरदेव यात्रा रद्द करण्यात आली . मांढरदेव मंदिराकडे जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे भाविक व नागरिकांना कोचळेवाडी येथेच अटकाव केला जात आहे.
दरम्यान, पोलिस व प्रशासनाकडून पाहणी बुधवारी या परिसराची पाहणी करण्यात आली.
वाई तालुक्यातील सुप्रसिद्ध मांढरदेवीची काळूबाई यात्रा कोरोनामुळे प्रशासनाने रद्द करुन निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर दावजी पाटील सुरूर येथील मंदिर परिसरात प्रशासनाने भाविकांना येण्यास प्रतिबंध केला आहे
या अनुषंगाने बुधवारी वाईचे तहसीलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी नारायण घोलप, वाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी मांढरदेव गावाला भेट दिली. पोलीस प्रशासनाने लावलेला बंदोबस्त तसेच यात्रा बंद कालावधीमध्ये ग्रामपंचायत मांढरदेव यांनी कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत.
याचाही आढावा यावेळी तहसीलदार भोसले यांनी घेतला. यादरम्यान मांढरदेव गावाचे सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक यांच्याशी चर्चा करून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मांढरदेव देवस्थानच्या वतीने मंदिर भाविकांसाठी संपूर्णपणे बंद असल्याचे प्रशासनाला सांगितले तसेच वाई पोलीस प्रशासनाच्या वतीने मांढरदेवच्या पायथ्याशी असलेल्या कोचळेवाडी गावापाशीच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मांढरदेव परिसराकडे जात असलेल्या भाविकांना याच ठिकाणी रोखून धरण्यात येत आहे.
त्यांना योग्य सूचना करून पुन्हा माघारी पाठवले जात आहे. दरम्यान, भाविकांनी मांढरदेव परिसराकडे जाऊ नये, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.