सातारा : जिल्ह्यात दीड लाख आरोग्य सेवक ‘बूस्टर’पासून वंचित

सातारा : जिल्ह्यात दीड लाख आरोग्य सेवक ‘बूस्टर’पासून वंचित

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात दहा जानेवारीपासून आरोग्य कर्मचार्‍यांना बूस्टर डोस दिला जात आहे. आत्तापर्यंत 30 हजार 505 जणांनी हा डोस घेतला आहे. अद्यापही दीड लाख कर्मचारी हा डोस घेणे बाकी असून, काहींमध्ये डोस घेण्यासाठी निरुत्साह दिसून येत आहे. अलीकडे कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने आरोग्य कर्मचार्‍यांचेही याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे.

जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू झाली. त्यावेळी बूस्टर डोस घेण्यासाठी हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्करची चढाओढ सुरू होती. काहींनी खासगी रुग्णालयामध्ये हा बूस्टर डोस घेतला. एका महिन्यात जवळपास 30 हजार कर्मचार्‍यांनी बूस्टर डोस घेतला. मात्र गेल्या आठ दिवसांपासून जशी लाट ओसरू लागली तसे बूस्टर डोस घेण्याचे प्रमाणही कमी झाले. आता आपल्याला काही होणार नाही. कशाला विनाकारण डोस घ्या. पुन्हा त्याचे काही साईड इफेक्ट झाले तर, अशा एक ना एक शंका कर्मचार्‍यांच्या मनामध्ये येत आहेत.

त्यामुळे सध्यातरी बूस्टर डोस घेण्यासाठी कर्मचार्‍यांमध्ये उत्सुकता नसल्याचे पाहायला मिळत आहे. कर्मचार्‍यांनी निष्काळजीपणा करू नये, नाव नोंदणी करून बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या सातारा तालुक्यात 9667, जावली 954, कराड 5499, खंडाळा 1439, खटाव 2008, कोरेगाव 1895, महाबळेश्वर 1350, माण 1242, पाटण 2242, फलटण 9667 व वाई तालुक्यात 2029 इतक्या जणांनी बूस्टर डोस घेतला आहे.

जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असली तरी बूस्टर डोस घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांनी नाव नोंदवून बूस्टर डोस घेणे गरजेचे आहे.
-डॉ. सुभाष चव्हाण,
जिल्हा शल्य चिकित्सक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news