सातारा : उसाला ‘कुणी तोड देता का तोड’

सातारा : उसाला ‘कुणी तोड देता का तोड’

पिंपोडे बुद्रुक : कमलाकर खराडे

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेकडो एकर उसाचे क्षेत्र तोडीच्या प्रतीक्षेत आहे. 15 ते 16 महिने उलटून गेल्यानंतरही ऊसतोड होत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे 'कुणी तोड देता का तोड' अशी म्हणायची वेळ शेतकर्‍यावर आली आहे. यापुढे उन्हाची तीव्रता वाढणार असल्याने आणि उसाला तुरे आल्याने वजनात येणारी घट शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान करणार आहे.

कोरेगाव तालुक्यात दिवसेंदिवस ऊस पिकाखालील क्षेत्र वाढत गेले. मात्र त्याची तोड वेळेत होत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान शेतकर्‍यांना सोसावे लागत आहे. साखर कारखाने, कारखान्याचा कर्मचारी, ऊसतोड कामगार, वाहन चालक या सर्वांनी मिळून शेतकर्‍यांचा जीव मेटाकुटीला आणला आहे.

पाण्याच्या उपलब्धतेमुळे उत्तर कोरेगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांत ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. किसनवीर साखर, जरंडेश्वर शुगर, शरयू अग्रो, स्वराज यासह अनेक कारखाने इथला ऊस गाळपासाठी नेतात. दरवर्षी अनेक ऊस तोड कामगार टोळ्या परिसरात ठाण मांडत असतात. मात्र, किसनवीर साखर कारखाना अडचणीत आल्याने या कारखान्याचा हंगाम सुरू झाला नाही. परिसरातील खाजगी साखर कारखान्यांनी थोड्याफार प्रमाणात ऊस नेला आहे. मात्र, वाहतूक खर्चाचे कारण पुढे करुन हे कारखानेही टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे सर्व बाजूंनी शेतकर्‍यांची गळचेपी सर्वच कारखान्यांकडून सुरू आहे.

गतवर्षी या परिसरातल्या आडसाली व सुरू उसाची लागण मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे आता या उसाची तोड करण्यासाठी चढाओढ लागली होती. मात्र, नवीन लागण क्षेत्र कमी असल्याने व खोडवा उसाचे क्षेत्र ज्यादा असल्यामुळे या परिसरात 'कुणी ऊस तोड करता का ऊस तोड' असं म्हणायाची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

15 ते 16 महिने होत आले तरी ऊसाला तोड मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पिंपोडे बुद्रुक सारख्या मोठ्या गावात शेकडो एकर ऊस क्षेत्र असताना शरयू आणि जरंडेश्वर या कारखान्यांच्या केवळ दोन टोळ्या कार्यरत आहेत. सध्या ऊसाला तुरे आले आहेत त्यामुळे उसाचे वजन घटू लागले आहे. परिणामी शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास अनेक शेतकर्‍यांचा ऊस तसाच शेतात उभा राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हार्वेस्टिंग मशिनने होतंय नुकसान

ऊसतोड कामगाराला पर्यायी व्यवस्था म्हणून हार्वेस्टिंग मशिनचा पर्याय आला आहे. त्यामुळे ऊस तोड जलद गतीने होण्यास मदत होत आहे. मात्र, हा पर्याय शेतकर्‍यांसाठी नुकसानकारक सिद्ध होत आहे. एकतर या मशिन तोडीच्या वजनात कारखाने एकूण वजनाच्या 5टक्के घट वजा करत आहेत. तर दुसरीकडे मशिनमधील तांत्रिक दोष, चालकाची मुजोरी व मनमानी, यामुळे शेतातच उसाचे तुकडे मोठ्या प्रमाणात पडून राहत आहेत. याशिवाय मशिन व्यवस्थापक शेतकर्‍यांकडून एकरी तीन ते पाच हजार रुपयांची मागणी करत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news