सांगली : शिराळा-वाळवा तालुक्यात बिबट्याचा उच्छाद !

बिबट्या
बिबट्या
Published on
Updated on

वारणावती : पुढारी वृत्तसेवा
चांदोली अभयारण्यातील अनेक बिबटे अन्नाच्या शोधात प्रकल्पाबाहेर पडले आहेत. शिराळा, वाळवा तालुक्यात अनेक ठिकाणी गावागावांत त्याचे दर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.

वन व वन्यजीव विभागामार्फत याबाबत कोणतीही पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस बिबट्याचा उच्छाद वाढू लागला आहे. भविष्यात मानव आणि बिबट्या संघर्ष अटळ आहे. असे चित्र निर्माण होऊ लागले आहे. चांदोली परिसरातील काळोखेवाडी, मिरूखेवाडी, बेर्डेवाडी, इनामवाडी, उखळू, मणदूर, सोनवडे, मणदूर धनगरवाडा खुंदलापूर धनगरवाडा, विनोबा ग्राम, जाधववाडी या परिसरात तर कोठे ना कोठे दररोज बिबट्याचे दर्शन हे होतच आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. वाळवा तालुक्यातील कासेगाव, वाटेगाव, नेर्ले या परिसरातही त्याचे वारंवार दर्शन होऊ लागले. यापूर्वी केवळ अभयारण्य परिसरात पाहायला मिळणारा बिबट्या आता गावोगावी दिसू लागला आहे. चार-पाच वर्षात येथे बिबट्यांची संख्या वाढली आहे. परिणामी त्याचे वारंवार दर्शन होऊ लागले आहे. शिवाय त्याचे प्राण्यांवरील हल्लेही वाढले आहेत.

या परिसरातील शेवडे मळा, भाट शिरगाव, कांदे शिंगटेवाडी, फकीरवाडी चिखलवाडी, डोंगरवाडी लादेवाडी जवळ असणारा कोटलिंग डोंगर परिसर, इंगरुळ तसेच बिळाशी, मांगरूळ येथील डोंगर परिसर बिबट्यासाठी सुरक्षित आश्रय स्थळ आहे. या डोंगर परिसरात तसेच उसाच्या शेतात अनेक बिबट्या मादीने आपल्या पिलांना जन्म दिला आहे. हीच पिले आता मोठी झाल्यामुळे बिबट्याची संख्या वाढली आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. बिबट्याने ज्या प्राण्यावर हल्ला केला आहे त्याचा पंचनामा केला जातो. संबंधित प्राणी मालकाला तुटपुंजी नुकसान भरपाई दिली जाते, यापलीकडे वन्यजीव विभाग काहीही करत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस बिबट्याचे प्राण्यांवरील हल्ले वाढू लागले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news