सांगली : ‘राईट ऑफ’वरून जिल्हा बँकेत राडा

‘राईट ऑफ
‘राईट ऑफ

सांगली : पुढारी वृत्तसेवा
बड्या नेत्यांची कर्जे वन टाईम सेटलमेंट आणि राईट ऑफ करण्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी सांगली जिल्हा बँकेसमोर बोंबाबोंब आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत बँकेत घुसण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना अडविले. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट झाली.

गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना 'राईट ऑफ' प्रकरणावरून आक्रमक झाली आहे. याबाबतच संघटनेच्या वतीने आज बोंबाबोंब आंदोलन केले.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, जिल्हा बँकेच्या सभेत बड्या नेत्यांच्या संस्थांचे थकीत कर्ज राईट ऑफ करण्यात येणार होते. तसेच केन अ‍ॅग्रो, माणगंगा, आणि महांकाली, डिव्हाईन फूड या तीन साखर कारखान्यांचे कर्ज पुनर्गठन करण्यात येणार होते. सर्व व्याज माफ करून हप्‍ते पाडून देण्यात येणार होते. दुसर्‍या बाजूला शेतकर्‍यांना सहा टक्के व्याजमाफी दिली जाणार आहे. पण ही माफी जे शेतकरी एकरकमी मुद्दल व व्याज भरणार आहेत त्यांनाच मिळणार आहे.

खराडे म्हणाले, नेत्यांच्या कर्जाला बारा वर्षे मुदत आणि शेतकर्‍यांनी मात्र एकाच वेळी भरले तरच लाभ मिळणार, हा दुजाभाव का? शेतकर्‍यांनीही मुदत द्या, त्यांचेही सर्व कर्ज आणि व्याज माफ करा. त्यानंतर संतप्‍त कार्यकर्त्यांनी बँकेत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना गेटवरच रोखले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. ' मागण्यांचे निवेदन अध्यक्षांना देतो, आम्हाला आता सोडा', अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. मात्र पोलिसांनी त्यांना नकार दिला. स्वाभिमानीचे पदाधिकारी भागवत जाधव यांनी बँकेत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पोलिसांची पकडून बाजूला नेले. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले.

अनेकजण गेटवरून उड्या मारून बँकेत गेले. काही कार्यकर्ते गनिमी काव्याने बँकेेत घुसले. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. आक्रमक झालेले संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बँकेच्या दारातच झोपले. काँग्रेस नेते आणि बँकेचे संचालक विशाल पाटील आणि शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह इतर संचालकांबरोबरचर्चेस येण्याची विनंती केली. त्यानंतर महेश खराडे, संदीप राजोबा, भागवत जाधव, अजित जाधव यांच्यासह काही कार्यकर्ते चर्चेस गेले. प्रा. शरद पाटील, साहेबराव पाटील, सदानंद कबाडगे, संजय बेले, राजेंद्र माने, पोपट मोरे, बाबा सांद्रे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बँकेबाहेर ठिय्या मारत बोंबाबोंब आंदोलन सुरूच ठेवले.
अध्यक्ष आमदारनाईक, ज्येष्ठ नेते बँकेचे संचालक आ. मोहनराव कदम, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, सरदार पाटील यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत शिष्टमंडळातील पदाधिकार्‍यांनी बड्या नेत्यांची कर्जे वन टाईम सेटलमेंट व राईट ऑफ करून व्याजात सवलत का आणि कशासाठी देता. शेतकर्‍यांना कर्जात व्याजाची सवलत का देत नाही, असा जाब विचारला.त्यानंतर कर्ज राईट ऑफ करण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. नाबार्ड व सहकार खात्याकडे प्रस्ताव पाठवून त्यांच्या मान्यतेनंतरच याबाबत विचार केला जाईल, असे अध्यक्ष नाईक यांनी सांगितले. त्यानंतर पदाधिकारी शांत झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news