जत (सांगली); पुढारी वृत्तसेवा : खोजनवाडी (ता. जत) येथे पादगड्डी या ठिकाणी गमेशा कंपनीच्या पवनचक्कीला आग लागली. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ही आग मुख्य यांत्रिक मशीन जवळ पवनचक्कीला आग लागली. शॉर्टसर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना आज (शुक्रवार) दुपारी १२ वाजता घडली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, खोजनवाडी येथील गमेशा कंपनीची पवनचक्की काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे बंद होती. ही पवनचक्की दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक कर्मचारी दुपारी पवनचक्कीच्या खाली थांबले होते, परंतु पवनचक्कीच्या मुख्य मशीन मधून धुराचे लोट दिसू लागले. प्रसंगावधान राखून कर्मचारी बाजूला थांबले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. उंचावरील वाऱ्यामुळे पवनचक्कीला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी धुराचे लोट वाऱ्याच्या वेगासोबत दूरवर पसरले होते.