Sangli Murder Case | विटा न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला मरेपर्यंत फाशी

खानापूर तालुक्यातील भूड येथे ७ जून २०२१ रोजी आरोपीने झोपेत असलेल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले
Khanapur Wife Murder Case Vita Court Verdict
आरोपी रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम Pudhari
Published on
Updated on

Khanapur Wife Murder Case Vita Court Verdict

विटा : सांगली जिल्ह्यातील खून प्रकरणाच्या न्यायालयीन इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारा निकाल विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे. पत्नीचा अत्यंत क्रूरपणे खून केल्याप्रकरणी आरोपी रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम (वय ४५, रा. भूड, ता. खानापूर, जि. सांगली) याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. गेल्या दहा वर्षांतील अशा स्वरूपाची ही पहिलीच शिक्षा असल्याचे मानले जात आहे.

या प्रकरणी मृत दीपाली कदम यांचे भाऊ राहुल अंकुश सुळे (रा. सुळेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) यांनी फिर्याद दाखल केली होती.

घटनेचा तपशील

खानापूर तालुक्यातील भूड येथे संतोष कदम, पत्नी दीपाली आणि त्यांची दोन मुले वास्तव्यास होती. ७ जून २०२१ रोजी सलग चार दिवस सुरू असलेल्या कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर आरोपीने झोपेत असलेल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. त्यानंतरही ती जिवंत असल्याचे लक्षात येताच तिच्या गळ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले.

Khanapur Wife Murder Case Vita Court Verdict
Sangli Crime: पकडलेला डंपर वाळू तस्करांनी पळविला

गंभीर अवस्थेतील दीपाली कदम यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, ११ जून २०२१ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात नंतर कलम ३०२ (खून)चा समावेश करण्यात आला.

तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी केला. पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष घाडगे तसेच खानापूर पोलिसांच्या पथकाने पूरक व सबळ पुरावे गोळा करून विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

Khanapur Wife Murder Case Vita Court Verdict
Sangli Crime : वारकऱ्यांच्या साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील अॅड. आरती देशपांडे-साटविलकर यांनी प्रभावीपणे मांडली. या खटल्यात मृत दीपाली कदम यांची अल्पवयीन मुलगी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. तिची न्यायालयातील साक्ष हा खटल्यातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरला. तसेच मिरजेचे तत्कालीन नायब तहसीलदार आर. पी. तोडकर यांनी नोंदविलेला मृत्यूपूर्व जबाबही न्यायालयीन प्रक्रियेत निर्णायक ठरला.

या खटल्यात एकूण १७ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. तपास अधिकारी जालिंदर जाधव, सरकारी वकील अॅड. आरती देशपांडे-साटविलकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष घाडगे, कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस फौजदार जितेंद्र कवठेकर, महिला पोलीस कर्मचारी निलम जगदाळे आणि भाग्यश्री नांगरे यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले.

Khanapur Wife Murder Case Vita Court Verdict
Sangli Crime: नेलकरंजीत पिस्टलचा सौदा फसला

सरकारी वकिलांचा सत्कार

या निकालानंतर विटा न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने सरकारी वकील अॅड. आरती देशपांडे-साटविलकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, फौजदार जितेंद्र कवठेकर, महिला पोलीस निलम जगदाळे आणि भाग्यश्री नांगरे यांनी न्यायालयाच्या बारमध्ये जाऊन त्यांचा गौरव केला.

दरम्यान, आजच्या निकालात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.आर.भागवत यांनी आरोपी रामचंद्र उर्फ संतोष कदम यास भा.द.वि.स. कलम ३०२ खाली दोषी धरून मरेपर्यंत फाशीची शिक्षा तसेच १ लाख रुपये इतका दंड, दंड न भरल्यास ३ महिन्याचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. यांत एकूण दंडापैकी २० हजार रुपये राज्य शासनास जमा करावेत व उर्वरित ८० हजार रुपये मृत महिलेची मुलगी हिस नुकसान भरपाई म्हणून द्यावे , असे आदेशही न्यायाधीश भागवत यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news