Sangli Crime: पकडलेला डंपर वाळू तस्करांनी पळविला

नागाव-निमणी (ता. तासगाव) येथे पेट्रोल पंपाजवळ उभा असलेला वाळूची बेकायदा वाहतूक करणारा डंपर महसूल पथकाने पकडला
Sangli Crime: पकडलेला डंपर वाळू तस्करांनी पळविला
pudhari photo
Published on
Updated on

तासगाव : नागाव-निमणी (ता. तासगाव) येथे पेट्रोल पंपाजवळ उभा असलेला वाळूची बेकायदा वाहतूक करणारा डंपर महसूल पथकाने पकडला. मात्र, वाळू तस्करांनी तो पळवून नेला. तासगाव ते शिरोली एमआयडीसी असा दीड तास आणि सुमारे ८० किलोमीटरचा थरारक पाठलाग महसूल पथकाने केला. मात्र, चकवा देऊन तस्कर डंपरसह फरार झाले.

याप्रकरणी सावळजचे मंडल अधिकारी रविकिरण सतीश वेदपाठक (वय ४८, रा. चिंतामणीनगर, सांगली) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी डंपर चालक रवींद्र ऊर्फ पांडू डिसले (रा. तासगाव) आणि एका अज्ञात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नागाव रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ वाळूने भरलेला डंपर उभा असल्याची गुप्त माहिती मंडल अधिकारी वेदपाठक यांना मिळाली होती. त्यांनी दहिवडीचे तलाठी राहुल माळी आणि तुरचीचे तलाठी विशाल वाघमारे यांना सोबत घेऊन सापळा रचला. पथक घटनास्थळी पोहोचले असता तेथे डंपर (एमएच १० सीआर ८०८६) वाळूने भरलेला आढळला.

पथकाने वाळूच्या परवान्याबाबत चौकशी सुरू केली असता, त्या ठिकाणी एक चॉकलेटी मोटार ( एमएच ४३ एटी ०२६३) आली. त्या गाडीतील चालकाने इशारा करताच डंपर चालक रवींद्र डिसले याने डंपर सुरू करून भिलवडीच्या दिशेने वेगात पळवला. महसूल पथकाने वाहनातून त्यांचा पाठलाग सुरू केला. पाठलागावेळी तस्करांच्या मोटारीने महसूल पथकाच्या गाडीला सातत्याने अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. तस्करांनी डंपर भिलवडी, तुंग मार्गे, सांगली-पेठ रस्ता ओलांडून कवठेपिरान, दुधगाव, बागणी, शेगाव, वडगाव ते शिये फाट्यावरून थेट राष्ट्रीय महामार्गाने शिरोली एमआयडीसीत नेला.

एमआयडीसी परिसरात तस्करांच्या मोटारीने महसूलच्या मोटारीचा मार्ग रोखल्याचा फायदा घेत डंपर चालक अंधारात पसार झाला. याप्रकरणी मंडल अधिकारी वेदपाठक यांच्या फिर्यादीवरून तासगाव पोलिसांनी दोन्ही संशयितांवर महाराष्ट्र महसूल संहितेनुसार गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news