

Shinde Shiv Sena vs BJP
विटा : सांगली जिल्ह्यात शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद आता थेट न्यायालयात पोहोचला आहे. निंबवडे जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत पराभूत झालेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांनी भाजपच्या विजयी उमेदवार माधवी पडळकर यांच्या विरोधात विटा न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
निंबवडे जिल्हा परिषद गटात विद्या मोटे आणि माधवी पडळकर यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या निवडणुकीत माधवी पडळकर यांनी ९८० मतांनी विजय मिळवला. मात्र हा पराभव मान्य नसल्याचे सांगत विद्या मोटे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
याबाबत बोलताना विद्या मोटे म्हणाल्या की, निंबवडे गटातील निवडणूक लोकशाही पद्धतीने न होता हुकूमशाही पद्धतीने पार पडली. निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. काही ठिकाणी मतदारांना धमकावणे, मारहाण करणे अशा प्रकारचे प्रकार घडल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व बाबींबाबत प्रशासन आणि पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर न्यायालयात याचिका दाखल करावी लागल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडणुकीत झालेल्या कथित गैरप्रकारांचे तसेच मतदारांवर झालेल्या अन्यायाचे पुरावेही याचिकेसोबत न्यायालयात सादर केल्याचे विद्या मोटे यांनी नमूद केले. न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
निंबवडे जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या माधवी पडळकर या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी तसेच जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी आहेत. तर विद्या मोटे या भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी व सहाय्यक आयकर आयुक्त सचिन मोटे यांच्या पत्नी आहेत.
दरम्यान, ही निवडणूक भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर प्रतिस्पर्धी उमेदवार व निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात याचिका दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचेही सांगितले जात आहे.