

नंदू गुरव
सांगली : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी रविवारी सकाळी आली आणि सांगलीवर शोककळा पसरली. बस स्थानकाजवळील घरात त्यांचं गेलेलं बालपण... मारुती चौकात असलेली नगरपालिकेची शाळा... अशी आशाताईंच्या लहानपणाची काही वर्षे सांगलीकरांनी अनुभवली होती. त्यानंतर महापालिकेच्या वतीनं 2000 मध्ये आयोजिलेल्या मंगेशोत्सवानिमित्त आणि सांगली भूषण पुरस्कारानिमित्त झालेली त्यांची भेट... या साऱ्या सांगलीकरांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. आशा भोसले यांच्या जाण्यानं सांगलीकर दु:खात बुडून गेले. ‘अभी ना जाओं छोडकर ये दिल अभी भरा नही’ या त्यांच्या गीताची सर्वांना आठवण झाली.
मंगेशोत्सवाच्या आठवणी...
26 वर्षांपूर्वी म्हणजे 2000 मध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्यावतीने मंगेशोत्सव आयोजिला होता. लता आणि आशा यांनी संगीताचे पहिले धडे सांगलीतच गिरवले होते, त्यामुळे या महोत्सवाला तसं भावनिक महत्त्व होतं. मंगेशकर भावंडांचं बालपण सांगलीत गेलं. त्यांच्या लहानपणीच्या सांगलीतील आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांचा नागरी सत्कार करण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला खुद्द लता मंगेशकर यांच्यासह हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि मीना खडीकर उपस्थित होत्या. हा एक ऐतिहासिक सोहळा होता. संगीताची आणि भावनांची एक मोठी पर्वणी होती. या सोहळ्यात आशा भोसले यांची उपस्थिती, त्यांनी साधलेला संवाद आजही सांगलीकर विसरलेले नाहीत.
महानगरपालिकेच्यावतीने सर्व भावंडांचा सन्मान करण्यात आला होता. लता, आशा, मीना, उषा आणि हृदयनाथ या सर्वांचं बालपण सांगलीत गेलं होतं. त्यामुळं या कार्यक्रमात त्यांच्या बालपणीच्या आठवणींवर आधारित विशेष गप्पांचा आणि मुलाखतींचा समावेश होता. गाण्यांचं सादरीकरण आणि मंगेशकर भावंडांनी गायिलेली काही विशेष पदं हा या सोहळ्याचा आत्मा होता. हा कार्यक्रम केवळ औपचारिक न राहता कौटुंबिक सोहळ्यासारखा झाला होता. तत्कालीन महापौर सुरेश पाटील यांनी प्रथम नागरिक या नात्यानं या साऱ्या भावंडांना मानपत्र प्रदान केलं होतं शिवाय या भावंडांच्याहस्ते नूतनीकरण केलेल्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं होतं.
‘तो’ मणिकांचन योग आलाच नाही...
अ ब क ड कल्चरल ग्रुपच्यावतीने मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती संगीत महोत्सव साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून स्वतः मी शरद मगदूम आणि वसंत करंदीकर आशाताईंना वाढदिवसाच्यावेळी मुंबईला जाऊन भेटलो. सांगलीहून आलो आहोत म्हटल्यावर त्यांनी आपुलकीनं आम्हाला बसवून घेतलं आणि आमच्याशी भरपूर बोलल्या. म्हणाल्या, माझा जन्मच सांगलीचा असल्यानं माझ्या जन्म गावात आणि आमच्या बाबांच्या नावानं संगीत महोत्सव करणाऱ्या संस्थेमध्ये कार्यक्रम करायला खूप आवडेल. त्यासाठी तारखा जुळवायचा प्रयत्न करते. नंतर त्यासाठी आम्ही प्रयत्नही केले. पण दुर्दैवानं तो माणिकांचन योग आम्ही आणू शकलो नाही; ही सल आता कायमचीच राहील, अशी भावना अ ब क ड कल्चरल ग्रुपचे अध्यक्ष शरद मगदूम यांनी व्यक्त केली.