

मांजर्डे : वडगाव (ता. तासगाव) येथे शेतामध्ये विविध कारणांनी लुप्त झालेले नैसर्गिक नाले पुन्हा खुले होणार आहेत. ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानानुसार नावीन्यपूर्ण आणि अन्य गावांनी आदर्श घ्यावा असे काम सुरू केले आहे. गावातील जवळपास 3 ठिकाणचे नैसर्गिक नाले खुले करण्यात आले आहेत, तर उर्वरित काम प्रगतिपथावर आहे.
गावात एकूण 1150 हेक्टर जमीन उपलब्ध आहे. यात मोठ्या प्रमाणात डोंगराळ प्रदेश आहे. यापैकी जवळपास 400 हेक्टर क्षेत्र शेतीयोग्य आहे. मागील काही वर्षापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे, वाहून आलेल्या गाळामुळे, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे नैसर्गिक नाले लुप्त झाले आहेत. नाले लुप्त झाल्यामुळे पावसाळ्यात जमिनीला पाणी लागणे, पाणी साचणे, जमीन नापीक होणे, उत्पादन घटणे अशी अवस्था निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी वाहते ठेवण्यासाठी, पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक नालेच नाहीत. त्याचा फटका गावातील शेतीला बसत आहे.
शासनाच्यावतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्यात आले. त्यामध्ये वडगाव गावाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गावाची शेती वाचविण्यासाठी सर्वजण एकत्र बसले. सर्वानुमते गावातील लुप्त झालेले नैसर्गिक नाले शोधून, ते पुन्हा खुले करण्याचे ठरले. त्यानुसार ठराव फक्त कागदावर न ठेवता, प्रत्यक्ष कामालाच सुरुवात करण्यात आली. गावातील सर्व नाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण करून प्रशासकीय मंजुरी घेऊन सर्वच नाले खुले करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामुळे पावसाचे पाणी वाहते ठेवणे, उत्पादनात वाढ, जमिनीचा पोत सुधारणे, शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होणे, जलसंवर्धन यासारखे फायदे होणार आहेत.
20 पैकी 3 नाल्यांचे काम पूर्ण
वरिष्ठ भूवैज्ञानिक जलसंधारण यंत्रणा सांगली यांच्या सल्लानुसार गावात सर्वेक्षण करून लुप्त पावलेले एकूण 20 नाल्यांचा शोध घेण्यात आला. परिसरातील शेतकरी व योजनेमध्ये सहभाग घेणे सोपे आहे. परंतु त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करणे अवघड आहे. गावाला अटल भूजल योजनेच्या माध्यमातून 20 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते. या रकमेचा वापर करून गावातील सर्व नाले खुले करण्यात येणार आहेत. याशिवाय शेतकरी, ग्रामस्थ यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणी सुद्धा जमा केली आहे. नाला खोलीकरण, रुंदीकरणामुळे जवळपास 125 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील शेतीला दिलासा मिळणार आहे. पाणीटंचाई कमी होण्यास, भूजल पातळी स्थिर ठेवण्यास, तसेच शेतीचा विकास गतिमान करण्यास मदत होणार आहे. ही योजना ग्रामीण विकासाचा आदर्श ठरणार असल्याचे मत पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील यांनी व्यक्त केले.