

शिराळा शहर : पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादन अधिक असल्याने साखर कारखान्यांची संख्याही जास्त आहे. कारखान्यांना लागणारा कच्चा माल शेतकऱ्यांच्या शेतातून कारखान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पेलणारा ऊसतोड मजूर मात्र वर्षानुवर्षे संघर्षमय जीवन जगत आहे. त्यांच्या जीवनसंघर्षाला पूर्णविराम मिळून त्यांच्या व्यथा कोण जाणणार का? की अजूनही जगण्यासाठी अशीच परवड होत राहणार?, अशी व्यथा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
निसर्गाची अवकृपा होत असलेल्या बीड, उस्मानाबाद, नगर, लातूर जिल्ह्यातून आणि जत तालुक्यातून हे मजूर कुटुंबासह ऊस तोडणीसाठी येतात. कारखान्यांच्या आवारात अथवा ज्या भागात ऊस तोडणी सुरू आहे, अशा ठिकाणी झोपडी उभारून ते तात्पुरता संसार थाटतात. भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत त्यांचे ऊस तोडणीचे काम सुरू असते. कुटुंबातील महिलावर्गाची त्यात मोठी साथ मिळते. उसाच्या फडात वाढे बांधणीचे काम त्या करत असतात. लहान लेकरांना बरोबर घेऊन शेतातच बांधावर तात्पुरत्या छोट्याशा पाळण्यात त्यांचा सांभाळ होत राहतो. त्यांच्या लेकरांना ऊन, वारा, विंचू, काट्याचे भय कधी वाटतच नाही. उसाच्या फडातच ती लहानाची मोठी होतात. कडाक्याच्या थंडीतही भल्या पहाटे कोयता हातात घेऊन फडात साऱ्यांची लगीनघाई सुरू होते. आर्थिक परिस्थितीअभावी आगामी उचल घेऊन यांचा उदरनिर्वाह चालत असतो. वर्षातील काही दिवस गावी, तर काही दिवस कारखान्यावर जात असल्याने मुलांच्या शिक्षणाची मात्र यामध्ये अपरिमित हानी होते.
ऊसतोड मजूर मुलांच्या समस्यांमध्ये शिक्षणापासून वंचित राहणे, स्थलांतरामुळे नियमित शाळेत न जाता येणे, बिबट्याकडून जिवाला धोका आणि त्यांना आवश्यक सुविधा न मिळणे या नुकसानीचा समावेश होतो. या समस्यांवर मात करण्यासाठी राज्य सरकारने शासकीय वसतिगृह योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे विद्यार्थ्यांना राहण्याची सोय, भोजनाची सोय, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य दिले जाते. परंतु या योजनेबद्दल अनेक ऊसतोड मजुरांना माहिती नाही. ही योजना तळागाळापर्यंत जाणे गरजेचे आहे.
दरम्यान, आमचा भाग दुष्काळी असल्याने पाण्याअभावी शेती फारशी पिकत नाही. यामुळे उदरनिर्वाहासाठी ऊस तोडणी करावी लागत आहे. दसऱ्यापासूनच आमची लगबग सुरू होते. कारखाना सुरू होईपर्यंत मिळेल ते काम करून कुटुंब चालवितो. त्यानंतर जरा दिवस बरे जातात. मुलेही आमच्याबरोबरच आहेत. आमचा हा संसार असाच उघड्यावर मांडलेला आहे, असे लमाणतांडा येथून आलेले ऊस तोडणी कामगार शरणाप्पा राठोड यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.