इस्लामपूर : पोलिसाच्या श्रीमुखात लगावल्याप्रकरणी दोघा भावांना कारावास

इस्लामपूर : पोलिसाच्या श्रीमुखात लगावल्याप्रकरणी दोघा भावांना कारावास
Published on
Updated on

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : पोलिसाच्या श्रीमुखात लगावून सरकारी कामात अडथळा तसेच सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोघा भावांना न्यायालयाने दोषी ठरवले. या प्रकरणी दोघांना एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. आसिफ रफीक ढगे (वय२१), मलिक रफीक ढगे (वय २३, दोघे रा. उर्दू शाळेजवळ, पेठ, ता. वाळवा) अशी आरोपींची नावे आहेत.

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ एस.एम. चंदगडे यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. हा मारहाणीचा प्रकार पावणेतीन वर्षापूर्वी घडला होता. याप्रकरणी पोलिस कर्मचारी भरत खोडकर यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

९ मार्च २०१९ रोजी पुणे – बेंगलोर महामार्गावर पेठ गावानजीक ट्रकचा अपघात झाला होता. अपघातातील ट्रक पोलिस कर्मचारी बाजूला घेत होते. त्यावेळी मलिक व आसिफ हे मोटारसायकलवरून आले. पंचनामा झाल्याशिवाय ट्रक का हलवितोस, असे म्हणून त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांशी वाद घातला.

'तुमची काय तक्रार असेल तर पोलिस ठाण्यात येऊन द्या', असे कर्मचाऱ्यांनी दोघांना सांगितले. त्यानंतर मलिक व आसिफ यांनी 'तू अशी गाडी घेवून जावू शकत नाहीस. आमचेही तीन-तीन ट्रक आहेत', असे म्हणून पोलिसांशी धक्काबुक्की केली. त्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली.

असिफ व मलिक यांच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. इस्लामपूर न्यायालयात त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीवेळी ६ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, पंच, प्रत्यक्षदर्शनी साक्षीदार, तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अनिलकुमार कुलकर्णी यांनी काम पाहिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news