…तर आमदारकीचा राजीनामा द्या : वैभव पाटील यांचे आमदार बाबरांना आव्हान

…तर आमदारकीचा राजीनामा द्या : वैभव पाटील यांचे आमदार बाबरांना आव्हान
Published on
Updated on

विटा : पुढारी वृत्तसेवा : कुणाला कमी लेखू नका, तुम्हाला एवढंच जर वाटत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, आम्ही किंवा आमच्यापैकी कुणालाही राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली, तर शंभर टक्के या मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार निवडून येईल, असे  आव्हान  माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आमदार अनिलराव बाबर यांना आज (दि. ८) दिले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुशांत देवकर, तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे आदी उपस्थित होते.

कृष्णा खोरे लवादाच्या वाटपातील अतिरिक्त पाणी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मिळणार आणि त्यातून ६ व्या 'अ' आणि 'ब' टप्प्याला पाणी देणार, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गेल्या आठवड्यात सांगलीत जाहीर केले होते. आता त्यावरून खानापूर मतदारसंघात श्रेयवादाचे घमासान सुरू झाले आहे. तुम्हाला सहाव्या टप्प्यातील गावे आणि भिजणारे क्षेत्र तरी माहिती आहे का ? अशी टीका आमदार अनिलराव बाबर यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर केली होती.  शिवसेनेच्या मतदारसंघात राष्ट्रवादीने ढवळाढवळ करू नये, असे सुनावले होते.

त्यावर वैभव पाटील म्हणाले की, सर्व पदाधिकाऱ्यांनी खानापूर मतदारसंघातील वंचित गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मंत्री जयंत पाटील यांच्याकडे वारंवार मांडला. त्यानंतर टेंभू च्या ६ 'अ' आणि ६ 'ब' या टप्प्यांना मंजुरी मिळाली. याबद्दल आम्ही आनंद साजरा केला, पेढे वाटले, फटाके फोडले तर तुमच्या पोटात का दुखले? हे खानापूरच्या जनतेला समजले नाही. आम्ही मागणी करताच वंचित शेतकऱ्यांची ही प्रलंबित मागणी मान्य केल्यास आम्ही जलसंपदामंत्र्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे सांगितले होते; पण याचेही तुम्हाला वाईट वाटले? आता राहिला विषय राष्ट्रवादीचा आमदार करण्याचा. तर तो २०१९ मध्ये आम्ही अपक्षऐवजी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढलो असतो, तर त्याच वेळी झाला असता, आम्ही आमच्या काही मित्रांच्या भरवश्यावर आणि शब्दांवर अपक्ष लढलो;  पण तुम्ही वरिष्ठ पातळीवरून त्यांच्यावर राजकीय दबाव आणून कपट नीतीने निवडणूक जिंकलात, असा आराेपही त्‍यांनी केला.

तुम्ही म्हणताय शिवसेनेच्या मतदारसंघात राष्ट्रवादीची लुडबुड चालू देणार नाही, तर मग राष्ट्रवादीच्या विटा नगरपालिकेच्या सत्तेमध्ये तुमची लुडबुड कशासाठी ? विटा पालिकेत तुम्ही वारंवार करीत असलेला हस्तक्षेप, पालिकेच्या अधिकाऱ्यांना दमदाटी आणि कार्यकर्त्यांच्या अडवणुकीबाबत ही उत्तर द्यायला पाहिजे होते. ते न देता सोयीचे आरोप करू नका. वास्तविक आम्हीही आता या लुडबुडीबद्दल मुख्यमंत्री आणि आघाडीच्या प्रमुखांकडे तक्रार करणार आहोत, असेही वैभव पाटील यांनी सांगितले. यावेळी ऐनवाडीचे सरपंच दाजी पवार, उपसरपंच सजूबाई तुपे, आत्माराम जाधव, अविनाश चोथे आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news