पुणे, पुढारी वृत्तसेवा : झिकाची लागण झाल्यास गर्भवतींनी अॅनॉमली स्कॅन करुन घेण्याचे आवाहन तज्ज्ञांतर्फे करण्यात आले आहे. अॅनॉमली स्कॅन गर्भधारणेच्या 18 ते 24 आठवड्यांमध्ये केले जाते. या स्कॅनमधून झिकाचा गर्भावर परिणाम झाला आहे का, हे समजते. बाळाला लागण झाली असल्यास गर्भपाताचा सल्ला दिला जातो. मात्र, आतापर्यंत भारतात एकाही झिकाबाधित महिलेकडून बाळाला लागण झालेली नाही. त्यामुळे गर्भवतींनी घाबरुन जाऊ नये, असेही नमूद करण्यात आले आहे.
शहरात सात क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 16 झिकाचे रुग्ण सापडले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे रुग्णांच्या आसपासच्या परिसरामध्ये सर्वेक्षण केले जात आहे. रुग्णांच्या परिसरातील 267 गर्भवती महिला या जोखमीच्या क्षेत्रात येतात. आरोग्य विभागातर्फे 118 गर्भवतींचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 8 गर्भवतींचे रक्तनमुने झिकासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. गर्भवतींच्या नाळेमधून बाळापर्यंत झिकाचा आजार पोहोचण्याची शक्यता असते. बाळापर्यंत संसर्ग पोहोचल्यास बाळाच्या डोक्याचा आकार कमी होणे, डोळयांचे व्यंग निर्माण होणे, ऐकायला कमी येणे अशी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यासाठी त्यांनी प्रसूती होईपर्यंत खबरदारी घेण्याची गरज असल्याचे सहायक आरोग्य अधिकरी डॉ. राजेश दिघे यांनी नमूद केले.
ताजे अन्न खाणे, फळे खाणे
फॉलिक असिड, आयर्न या गोळयांचे सेवन करणे
डॉक्टरांकडे नियमितपणे तपासणी करणे
घरात कोठेही पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
दिवसा झोपतानाही मच्छरदाणीचा वापर करावा
एकदा झिकाचा संसर्ग होऊन गेला तरी रुग्णाच्या शरीरात त्याचा विषाणू सहा महिन्यांपर्यंत सुप्तावस्थेत राहू शकतो. अशा रुग्णाला डास चावला आणि तो दुस-याला चावला तरी त्याचा संसर्ग दुस-याला होऊ शकतो. अशा व्यक्तीबरोबर असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास दुस-या जोडीदाराला होऊ शकतो.