Zika Virus | शहरात झिकाचा पाचवा रुग्ण; गर्भवतीला लागण

एरंडवणेतील गणेशनगरमधील घटना : प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक
Fifth patient of Zika virus has been found in Pune
पुण्यात झिका आजाराचा पाचवा रुग्ण आढळून आला आहेFile Photo
Published on
Updated on

पुणे : पुण्यात झिका आजाराचा पाचवा रुग्ण आढळून आला आहे. एरंडवणेतील गणेशनगरमधील गर्भवती महिलेला झिकाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सामान्य रुग्णांमध्ये झिका फारसा धोकादायक नसला, तरी गर्भवतीला आणि तिच्या बाळाला धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.

कोणताही विषाणुजन्य संसर्ग गर्भवतीला झाल्यास नाळेद्वारे बाळाकडे प्रसारित होतो. गर्भवतीला किती लक्षणे तीव्र आहेत, त्यावरही अवलंबून असते. गर्भवतीला झिकाची लागण झाल्यास बाळामध्ये मायक्रोसेफेली म्हणजेच त्याच्या डोक्याचा घेर हा नेहमीच्या तुलनेत छोटा होऊ शकतो. तसेच इतर विकृतीही निर्माण होऊ शकतात. म्हणून ही बाब गंभीर असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एरंडवणेमधील घटना

शहरात मागील आठवड्यात एरंडवणे भागात झिकाचे दोन रुग्ण आढळून आले होते. यामध्ये 46 वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या 15 वर्षीय मुलीचा समावेश होता. त्यानंतर मुंढवा येथे 47 वर्षीय एक महिला आणि तिच्या 22 वर्षांच्या मुलालाही झिकाचे निदान झाले. आता पुन्हा एरंडवणेतील गणेशनगरमधील 28 वर्षीय गर्भवतीला लागण झाल्याने झिकाचा संसर्ग इतरत्र पसरल्याचीही भीती व्यक्त होत आहे.

पुरंदर तालुक्यात आढळला होता महाराष्ट्रातील पहिला रुग्ण

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात 30 जुलै 2021 मध्ये महाराष्ट्रातील रुग्ण आढळून आला होता. आहे. एका महिलेला झिका आणि चिकनगुनियाची लागण झाली होती. या परिस्थितीचे परीक्षण करण्यासाठी आणि झिकाबाधित रुग्णांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बहुआयामी पथक महाराष्ट्रात रवाना केले होते.

पथकाने प्रशासकीय स्तरावर विविध प्रतिबंधात्मक उपाय, मार्गदर्शक तत्त्वे, नियमावली याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतर गेल्या वर्षी येरवडा भागातील एका महिलेला झिकाची लागण झाली होती. यावर्षी 10 दिवसांत झिकाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, काल पुण्यात पालख्यांचे आगमन झाले आहे. दोन-अडीच लाख वारकरी पुण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे संसर्ग वाढू नये याद़ृष्टीने उपययोजना करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

एरंडवणे भागात गर्भवती महिलेला झिकाची लागण झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

डॉ. कल्पना बळीवंत, आरोग्य उपप्रमुख, पुणे महापालिका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news