

विटा : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप आणि पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी केले.
विट्यातील यशवंतराव चव्हाण पुतळ्याजवळील शिवसेनेच्या कार्यालयात आयोजित प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधत पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, असे निर्देश आमदार बाबर यांनी दिले.
ते म्हणाले, दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी संघटनात्मक ताकद उभी करून सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम केले पाहिजे. शिक्षक मतदार संघातील उमेदवार सचिन सानप हे शिक्षकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सक्षम असून, त्यांच्या न्याय्य मागण्या सोडवण्यासाठी ते प्रभावी भूमिका बजावतील.
शिक्षकांचे हित आणि शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी त्यांना बळ देणे गरजेचे आहे. तसेच पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव या उच्चशिक्षित असून, सुशिक्षित तरुणांचे प्रश्न, रोजगाराच्या संधी व पदवीधरांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्या निश्चितच प्रयत्नशील राहतील.
समन्वयाने काम करण्याचे आवाहन
शिक्षक मतदार संघातील शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप आणि पदवीधर मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. शिक्षक आणि पदवीधर मतदारांशी थेट संपर्क साधून पक्षाची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवावी आणि योग्य नियोजन करून विजयासाठी संघटितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी यावेळी केले.