Suhas Babar : अतिवृष्टीने बाधित द्राक्ष, डाळिंब व ऊस पिकांच्या नुकसानीबाबत मदत द्या

आमदार सुहास बाबर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Suhas Babar
अतिवृष्टीने बाधित पिकांच्या नुकसानीबाबत मदत देण्याची आमदार सुहास बाबर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Published on
Updated on

विटा : सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि तासगाव तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्ष, डाळिंब व ऊस पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, याबाबत आमदार सुहास बाबर यांनी मंगळवारी (दि.३०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मुंबईत भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.

Suhas Babar
Kolhapur Sangli Satara corridor | कोल्हापूर-सांगली-सातारा डेव्हलपमेंट कॉरीडॉर!

यावेळी आमदार बाबर म्हणाले की, खानापूर तालुक्यात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. या भागातील द्राक्षाचा दर संपूर्ण बाजारपेठेत मार्गदर्शक मानला जातो. मात्र, द्राक्ष हे हवामानासाठी अत्यंत संवेदनशील पीक आहे. गेल्या काही महिन्यांपासून सतत पाऊस झाला. या सततच्या पावसामुळे बागांमध्ये पाणी साचले आहे. परिणामी द्राक्षांच्या काड्या सक्षम न राहिल्याने फळधारणा दर्जेदार होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. तसेच करपा, मूळकुज आणि दावण्या यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.डाळिंब पिकाच्या बाबतीतही अशीच स्थिती असून, सततच्या पावसामुळे पिनहोल, फळकुज आणि इतर रोगांमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

टेंभू योजनेचे पाणी उपलब्ध झाल्याने अलीकडच्या काळात ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मात्र, ऊस पिकाला पीक विमा व शासनाच्या अनुदानाचा लाभ मिळत नाही. यावर्षी अडसाली ऊस लागवडीवर सततच्या पावसाचा परिणाम होऊन लागवड पूर्णपणे वाया गेली आहे. रोपे व कांड्या कुजल्यामुळे संपूर्ण लागवड उध्वस्त झाली आहे. शिवाय अवकाळी पावसामुळे शेतात उभा असलेला ऊस पडून गेला असून, मूळ कुज, तांबेरा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नव्याने गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असे आमदार बाबर यांनी सांगितले. तसेच सांगली जिल्ह्यातील द्राक्षे, डाळिंब व ऊस पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच नुकसान झालेल्या सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केल्याचेही आमदार सुहास बाबर यांनी सांगितले.

Suhas Babar
Kolhapur Floods | खोची - दुधगाव रस्त्यावर पाणी; सांगली जिल्ह्याचा संपर्क तुटला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news