

सुनील कदम
कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सर्वांगिण संयुक्त विकासासाठी या तीनही जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील बिनीचे शिलेदार पुढे येण्यास तयार असल्याचे नुकत्याच कोल्हापुरात झालेल्या चर्चासत्रातून स्पष्ट झाले. या चर्चासत्रात या भागाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या अनेक विषयांवर चर्चा होऊन अनेक कल्पनांना काहीसे मूर्त स्वरूप आल्याचेही स्पष्ट झाले.
औद्योगिक प्रगतीवर भर!
माजी मंत्री आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे तिन्ही जिल्ह्यातील जवळपास 200 हून अधिक उद्योग व्यावसायिक त्यासाठी उपस्थित राहिले होते. या तीनही जिल्ह्यांची खुटलेली आणि रोडावलेली औद्योगिक प्रगती, त्याची कारणे आणि उपाय हा या चर्चासत्राचा मुख्य गाभा होता. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या विकास कल्पनांवर सांगोपांग चर्चा झाली. हवाई मार्गासह अन्य मार्गांची राज्याशी व देशाशी संपर्कासाठी कमी पडत असलेली उपलब्धता हा या भागाच्या औद्योगिक विकासासाठी मुख्य अडथळा ठरत असल्याची बाब अनेक उद्योग-व्यावसायिकांनी व्यक्त केली. त्याचबरोबर अपुर्या कुशल कामगारांच्या संख्येबाबतही उहापोह करण्यात आला.
केवळ औद्योगिक विकासच नव्हे तर पर्यटन, कृषी पूरक उद्योग-व्यवसाय, आय. टी. पार्क, कलादालन निर्मिती, नाट्यगृहांचा विकास, मिरज मेडिकल हब, कोल्हापूर-सांगली-सातारा खाद्यसंस्कृती, शिक्षण संस्थांचे सबलीकरण, एम्स सारख्या हॉस्पिटल्सची उभारणी, तीन जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांना जोडणारी मेट्रो सेवा, रेल्वेमार्गांचे दुहेरीकरण, सहकारी औद्योगिक वसाहतींची उभारणी, शिवाजी विद्यापीठाचा शैक्षणिक विकास, कोल्हापूर-कोकण रेल्वेमार्गाची उभारणी, कर प्रणालीमध्ये या भागाचे योगदान, क्रीडाविकास, इथल्या संपन्न पर्यावरणाचे संवर्धन, फार्मसी इंडस्ट्रीची उभारणी, तीन जिल्ह्यांची मिळून इंडस्ट्रिअयल टाऊनशीप, त्यासाठी प्राधिकरणाची निर्मिती यासह अनेक विषयावर मते व्यक्त झाली.
विशेष म्हणजे आजपर्यंत कोल्हापूर-सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या विकासाबाबत त्या त्या जिल्ह्यात अनेक चर्चासत्रे आणि बैठका वेगवेगळ्या पातळीवरून झालेल्या आहेत. पण, या तीन जिल्ह्यांची ‘समान परंपरा आणि वारसा’ विचारात घेऊन संयुक्तिकरित्या आयोजित केलेली ही पहिलीच बैठक ठरली आणि त्यामुळेच ती अधिक लक्षवेधी ठरते.
या तीन जिल्ह्यात मिळून 27 नद्या आणि 30 गडकिल्ले आहेत. शिवाय तीनही जिल्ह्यांना जोडणारे सह्याद्रीचे पठार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, दाजीपूर व राधानगरी अभयारण्य, या भागातील अद्भुत निसर्गसौंदर्य, या भागातील आराध्य देवस्थान ठिकाणे या सगळ्यांचा वापर करून या भागाच्या पर्यटन विकासाला चालना द्यावी असाही चर्चासत्राचा सूर होता. विशेष म्हणजे या भागाचा सामुदायिक औद्योगिक विकास साधताना इथल्या पर्यावरणाला धक्का लागता कामा नये असाही सूर उमटलेला दिसला.
एकूण बाबी विचारात घेता गेल्या काही वर्षांत या भागाचा सर्वांगिण विकास विविध कारणांनी खुंटलेला बघायला मिळतोच आहे. त्याचेच प्रतिबिंबिं इथेही बघायला मिळाले. पण, या ठिकाणी मांडलेल्या नवकल्पनांना मूर्त स्वरूप मिळत गेल्यास या तीन जिल्ह्यांच्या संयुक्तिक विकासाचे स्वप्न साकारायला वेळ लागणार नाही, एवढे निश्चित!
लवकरच या विकास गटाला मूर्त स्वरूप देण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. हा गट पूर्णपणे राजकारण विरहीत आणि केवळ या तीन जिल्ह्यांच्या संयुक्तिक विकासासाठी कार्यरत राहण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या विकास फोरमचे ध्येय आणि त्यामध्ये असलेला अनेक दिग्गजांचा सहभाग विचारात घेता लवकरच या तीन जिल्ह्यांच्या संयुक्त विकासाची एखादी नवीन योजना आकाराला येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.