

Khochi Dudhgaon road
खोची: वारणा नदीचे पाणी खोची - दुधगाव रस्त्यावर आल्याने मार्ग वाहतुकीस बंद झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे. मागील 24 तासांत पाणी पातळीत खूप मोठी वाढ झाली आहे. मळीभागच्या पुढील शेती या पावसाळ्यात प्रथमच पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होऊ लागला आहे.
चांदोली धरणातून होणारा विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रात होणारा धुवाधार पाऊस यामुळे वारणा नदीची पाणी पातळी वेगाने वाढत आहे. यामुळे महापुराकडे वाटचाल सुरू झाली आहे. खोची येथील भैरवनाथ मंदिर परिसरात पाण्याची पातळीने जुने थडगे बुडविले. रात्रीपर्यंत गावातील गणेश मंदिरापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भेंडवडे येथील ओढ्याची पाणी पातळी पसरल्यामुळे बागडी समाज बांधवांच्या घराजवळ पाणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे येथील रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खोची दुधगाव नवीन पुला जवळच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर पाणीपातळी वाढली आहे. या ठिकाणची वाहतुक दुपारपासून पूर्णपणे बंद झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी खबरदारी सूचना फलक उभारले आहेत. महसूल आणि जलसंपदा विभागाकडून पाण्याच्या विसर्गासंदर्भात माहिती दिली जात आहे.
दरम्यान, नदीकाठच्या भागातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे गावाकडे आणली आहेत. त्याचबरोबर येथील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे. सलगच्या पावसाने जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन कोलमडले आहे. दिवसभर अपवाद वगळता पावसाची उघडीप मिळाली. ढगाळ वातावरणातून दिवसभर सूर्यदर्शन होत राहिले. ही बाब दिलासादायक होती.