

अरुण साळुंखे
नेवरी : कडेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील तोडणीस आलेल्या उसाला मोठ्या प्रमाणात तुरे आले आहेत. या तुर्यामुळे ऊस उत्पादनात घट होत असल्यामुळे शेतकर्यांनी वर्षभर केलेल्या कष्टावर पाणी फिरत आहे. हवामानातील बदल व खरीप हंगामामध्ये पडलेला भरपूर आणि लांबलेला पाऊस याचा हा परिणाम असल्याचे चित्र आहे.
कडेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये टेंभू, ताकारी व आरफळ या सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रामध्ये ऊस उत्पादन क्षेत्राची लक्षणीय वाढ झाली आहे. याचा परिणाम परिसरातील बंद असणारे ऊस कारखाने पूर्ण क्षमतेने चालू झाले आहेत. यावर्षी हवामानातील बदल आणि खरीप हंगामामध्ये पडलेला जोरदार पाऊस यामुळे ऊस उत्पादनावर याचा विपरित परिणाम दिसून येत आहे. सध्या परिसरामध्ये ऊस लागवडीसाठी 86032, 10001, 8005, 3102 व 1506 या वाणांचा वापर केला जात आहे.
यातील 10001, 8005 या वाणाच्या उसाची मुदतीत तोड झाली नाही, तर तुरे येतात. तसेच 86032 हे ऊस वाण सर्व परिस्थितीत चालते. यातून लागवडीसाठी शेतकर्यांची पहिली पसंती या वाणाला राहते. परंतु यावर्षी या वाणालादेखील तुरे आल्याचे चित्र परिसरात आहे. उसाला आलेल्या तुर्यामुळे ऊस वजनामध्ये लक्षणीय घट होत आहे.
याचा शेतकर्यांना आर्थिक फटका बसत आहे. तुरे आलेल्या ऊस क्षेत्राची ऊसतोड लवकर करण्यासाठी शेतकर्यांचे कारखाना कार्यालयाकडे हेलपाटे चालू आहेत. परंतु कारखाने मुदतपूर्व ऊस तोडण्यास तयार नाहीत. खरीप हंगामातील संततधार झालेल्या पावसामुळे उसाची आंतरमशागतीची कामे वेळेत झाली नाहीत. यामुळे यावर्षी सगळीकडेच ऊस उतारा घटू लागला आहे. यातून ऊस कमी पडणार आहे.