

सांगली : बेडग (ता. मिरज) येथे मंगसुळी रस्त्यावर बुधवारी रात्रीच्या वेळी सहा लाख 96 हजार रुपयांचा पान मसाला घेऊन जाणारी मोटार पकडण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली. याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी अनिल पवार यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी बाहुबली सुकुमार चौगुले (ता. हातकणंगले) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. या गुन्ह्यातील साडेसहा लाख रुपयांची मोटार जप्त करण्यात आली आहे. बाहुबली चौगुले हा प्रतिबंधित पान मसाला घेऊन जात असल्याची माहिती अन्नसुरक्षा अधिकारी पवार यांना मिळाली. त्यांनी बुधवारी रात्री सापळा लावला. चौगुले याची मोटार अडवून तपासणी केली असता त्यामध्ये पान मसाला आढळून आला. पान मसाला व मोटार जप्त करून चौगुले यास अटक करण्यात आली. अधिक तपास सुरू आहे.