

कवठेमहांकाळ : देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथे ऊसतोड चालू असताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून ऊसतोड मजुराचा मृत्यू झाला. सुभाष किसन माळी (मूळ रा. वटकळी, ता. सेनगाव, जि. हिंगोली) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवार, दि. 3 डिसेंबररोजी रात्री 8.30 वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत शशिकला बबन मंजुळकर (वय 45, सध्या रा. देशिंग, ता. कवठेमहांकाळ, मूळ रा. इंदिरानगर, माजलगाव, ता. माजलगाव जि. बीड) यांनी कवठेमहांकाळ फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी शशिकला मंजुळकर यांचे जावई सुभाष माळी हे देशिंग येथील चौगोंडा निजगोंडा पाटील यांच्या शेतात ऊसतोडीचे काम करीत होते. यावेळी चालक विश्वजित सिध्देश्वर गपाटे याने ट्रॅक्टर (एमएच 25 एल 2716) हयगयीने, निष्काळजीपणे, परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मागे-पुढे कोण आहे की नाही, याची खात्री न करता बेदरकारपणे चालविल्यामुळे सुभाष हे त्याच्या ट्रॅक्टरखाली सापडले. गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक विश्वजित गपाटे याच्याविरोधात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे करत आहेत.