

तासगाव : येथील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात आईने दारू पिण्यास पैसे न दिल्याने मुलाने तिचा तलवारीने हल्ला करून खून केला. ही घटना बुधवारी (दि. 15) रात्री घडली. शांताबाई चरण पवार (70) असे मृत महिलेचे नाव आहे. संशयित मुलगा जगनू ऊर्फ जगण्या चरण पवार (52, रा. इंदिरानगर, तासगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ उपकार्या चरण पवार (56) याने फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जगनू हा फिर्यादी उपकार्या व त्याची आई शांताबाई यांच्यासोबत तासगाव येथील इंदिरानगर झोपडपट्टीत राहतो. संशयित जगण्या हा फिर्यादी उपकार्याचा लहान भाऊ आहे. जगण्याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत भांडण करत असे. बुधवारी रात्रीही त्याचा आई शांताबाई हिच्याशी वाद झाला. शांताबाई त्याला दारूसाठी पैसे देण्यास नकार देत होत्या. यातून चिडून त्याने आईचे केस पकडून खाली पाडले. त्या जमिनीवर पडताच त्यांच्या डाव्या कानाच्या बाजूस, तसेच बरगडीच्या खाली तलवारीने वार केले. वर्मी वार बसल्याने शांताबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यानंतरही जगण्याने पुन्हा बरगडीच्या खाली तलवारीने भोसकले. या अमानुष हल्ल्याने शांताबाई गंभीर जखमी होऊन निपचित पडल्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हलकल्लोळ माजला. घटनेची माहिती तासगाव पोलिसांना दिली. पोलिस पथक तत्काळ दाखल झाले. उपअधीक्षक अशोक भवड व निरीक्षक सोमनाथ वाघ यांनीही भेट देऊन घटनेची माहिती घेतली. रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर शांताबाई यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी संशयित जगण्या पवार याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.