

बिलोली : कामगाराचा खून करुन मृतदेह पोत्यात बांधून गावच्या शेजारी असलेल्या नाल्यात फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरूवारी (दि.१६) सकाळी ११ वाजता बिलोली तालुक्यातील बेलकोणी बु. येथे उघडकीस आली. शंकर बालन मोंडेवाड (वय ४५) असे मृताचे नाव आहे.
शंकर मोंडेवाड हे तेलंगणात कामगार म्हणून काम करत होते. त्यांची पत्नी तेलंगणातील असून चार वर्षांपासून पत्नीबरोबर वेगळे झाल्यानंतर आपल्या आईबरोबर आपल्या गावी बेळकोणी बुद्रुक येथे राहत होते. गुरूवारी सकाळी गावातील काहींना नाल्यात मोठे पोत्याचे गाठोड आढळून आले. हे गाठोडे सोडून पाहिले असता यामध्ये शंकर यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत हराळे, पोलीस उपनिरीक्षक नरवाडे, बीट जमादार सुर्यवंशी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर श्वान पथकाला पाचारण करून पंचनामा करण्यात आला.
मृत शंकर हे बुधवारी रात्री आपल्या मित्राबरोबर होते. दुसऱ्या दिवशी शंकरचा मृतदेह पोत्यात बांधून नाल्यात फेकल्यात आल्याचे आढळून आल्याने मित्राने मित्राचा खून केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार पथके तयार करून संशयित मित्राचा शोध सुरू केला आहे. दोन पथके उमरी धर्माबाद व तेलंगणात पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.