

Land Compensation
आटपाडी : शेटफळे ता.आटपाडी येथे शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांनी शेतात आडवे झोपून कडाडून विरोध केला.मोजणीसाठी आलेल्या महसूलचे अधिकारी आणि मोजणी पथका समोर अनोख्या पद्धतीने शेतकऱ्यांनी ही मोजणी रोखली. जमिनीचा योग्य मोबदला जाहीर केला तरच मोजणी अन्यथा हा महामार्ग नको अशी थेट आणि आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. दिवसभर अधिकारी आणि पथक तळ ठोकून होते.
शेटफळे येथून शक्तिपीठ महामार्ग गेला आहे. महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या पथकाला आधी एकदा शेतकऱ्यांनी विरोध केला होता. आज पुन्हा एकदा पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्यासह पोलीस बंदोबस्तात महसूल आणि भूमीअभिलेख कर्मचारी तुबू मळ्यात दाखल झाले. दहा वाजता मोजणी यंत्रणा सज्ज झाली.शेतकऱ्यांनी ही मोजणी थांबवण्याची विनंती केली.त्यामुळे पथकाने तात्काळ मोजणी थांबवून वरिष्ठांना माहिती कळवली.
त्यानंतर प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार सागर ढवळे यांनी शेतकऱ्याची चर्चा केली. शेतकऱ्यांनी आधी योग्य भरपाई जाहीर करण्याची मागणी केली.प्रांताधिकारी डॉ.बांदल यांनी सहकार्य करणाऱ्यांना शासकीय भावाच्या पाचपट आणि विरोध करणाऱ्यांना चारपट भरपाई देऊ अशी आश्वासनयुक्त भिती दाखवली. मग शेतकरी संतापले आणि आम्हाला महामार्गच नको अशी भूमिका घेत जोरदार घोषणा दिल्या.
दरम्यान अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार भूमि अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी मोजणी सुरू करताच शेतकरी अधिकारी आणि मोजणी यंत्रणेसमोर घोषणा देत शेतात आडवे झोपले. शेतकऱ्यांचा हा रुद्रावतार बघताच मोजणी थांबवून पथकाने पळ काढला.
त्यानंतर पाटील मळ्यात केवळ एका शेतकऱ्याची मोजणी झाली. अन्य शेतकऱ्यांनी मोजणीस तीव्र विरोध केला. प्रांताधिकारी डॉ. बांदल आणि तहसीलदार ढवळे मोजणी पथका सोबत पाटील मळ्यात दिवसभर तळ ठोकून होते. त्यांनी हद्द निश्चित करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.यावेळी गणपत कदम, बाळासो गायकवाड, धनंजय गायकवाड, शिवाजी गायकवाड, दिलीप पवार, पोपट गायकवाड, अशोक गायकवाड, आप्पासो गायकवाड, साईराम पाटील, शशिकांत मोरे आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.