

विटा : विटा पालिकेच्या नव्या सुधारित प्रभाग रचने च्या आराखड्यानुसार आगामी निवडणूकीत एक प्रभाग आणि दोन नगरसेवक वाढणार आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपद जनतेतून तर प्रत्येकी २ अशा एकूण १३ प्रभागांतून एकूण २६ सदस्य निवडले जाणार आहेत.
पालिकांच्या निवडणूकांचे रणांगण जवळ आले आहे. प्रशासकीय पातळीवर नगरपालिकेसाठी प्रभाग रचना करण्याचे काम सुरू झाले आहे. यावेळी विटा पालिकेसाठी एक प्रभाग आणि दोन नगरसेवक वाढणार आहेत. दोन सदस्यीय प्रभाग रचनेतून एकूण १३ प्रमागातून २६ नगर सेवक निवडून येणार आहेत, तर नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. यावेळी विटा पालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातच लढत होण्याची चिन्हे आहेत.
विटा पालिका हद्दीत २०११ च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या ४८ हजार २८९ आहे. त्यानुसार १३ प्रभागातून २६ नगरसेवक संख्या राहणार आहे. विट्यात अनुसुचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या ६ हजार ६२८ आहे. तर अनुसुचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या ४०२ आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसुचित जाती प्रवर्गाचे ४ नगरसेवक असणार आहेत. यापैकी २ महिला आहेत.
एकूण २६ पैकी ७ नगरसेवक नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असतील. यापैकी ४ महिला असणार आहेत. तर एकूण १३ महिला नगरसेविका असतील. तर सर्वसाधारण प्रवर्गातील ८ नगरसेवक असणार आहेत. एका प्रभागाची लोकसंख्या साधारणपणे ३ हजार ७१५ राहणार आहे. यांत १० टक्के कमी-जास्त होऊ शकते.
सध्या विटा पालिका प्रशासनाने प्रभाग रचनेतील प्रगणक गटाची मांडणी करणे आणि प्रारूप प्रभाग रचना करण्याच्या टप्प्यातील जनगणनेची प्राप्त माहिती तपासणे, स्थळ पाहणी करणे हे टप्पे पूर्ण केले आहेत. आता ४ जुलै ते १० जुलै पर्यंत आणि गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे, ११ ते १७ जुलै नकाशावर तयार केलेल्या प्रभाग हद्दी जागेवर जावून तपासणे आणि त्यानंतर १८ ते २४ जुलै या दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार होईल.
२९ जुलै पर्यंत हा प्रस्ताव नगरविकास विभागास जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सादर केला जाणार आहे. ६ ऑगस्टपर्यंत नगरविकास विभाग हा प्रस्ताव निवडणूक आयोगास सादर करेल. त्यानंतर त्याला मंजूरी मिळून १८ ते २१ ऑगस्ट पर्यंत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागवल्या जातील.
२२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या हरकतींवर सुनावणी होईल. २ ते ८ सप्टेंबर रोजी हरकतीवरील शिफारसी लक्षात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यां नी केलेली अंतिम प्रभाग रचना नगरविकास विभागाला सादर केली जाईल. त्यानंतर १५ सप्टेंबर पर्यंत नगरविकास विभाग ही अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाला सादर करेल. २६ ते ३० सप्टेंबर पर्यंत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली अंतिम प्रभाग रचना अधिसुचनेद्वारे प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे प्रत्यक्षा नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी ऑक्टोबर महिना उजाडणार आहे