

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : आटपाडी शहरातील साठेनगर चौकातील अतिक्रमणे आज (दि.११) दुपारी हटविण्यात आली. नगरपंचायतचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांनी याबाबत सुचना केल्या होत्या. या कारवाईमुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. (Sangli News)
साठेनगर ते नगरपंचायत कार्यालय हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे. या मार्गावरून मोठी वाहतूक सुरू असते. या रस्त्याच्या पूर्वेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन आणि पश्चिममेस आटपाडी एज्युकेशन संस्थेचे शिक्षण संकुल आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणांचा वेढा पडलेला होता. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत होती. आता सर्व अतिक्रमणे काढल्याने रस्ता प्रशस्त झाला आहे.
१५ दिवसांपूर्वी बचत भवन जवळील गटाराचे काम झाले आहे. यावर तीन छोटया व्यावसायिकांनी पूर्वीच्या जागेवर पुन्हा एकदा ताबा मिळवत अतिक्रमण केले होते. मुख्याधिकारी वैभव हजारे यांनी अतिक्रमण केलेल्यांना स्वतःहुन अतिक्रमण हटवा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे दोन अतिक्रमणधारकांनी स्वतः हुन दुपारी अतिक्रमण काढून घेतली.
दरम्यान साठेनगर ते नगरपंचायत कार्यालय, पोलीस स्टेशन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय आणि शहरातील अन्य मुख्य चौकात, महत्वाच्या ठिकाणी अतिक्रमणांचा प्रश्न जटील होत चालला आहे. सार्वजनिक विभागाला या अतिक्रमणांचे काही देणे घेणेच नाही, अशी परिस्थिती आहे.