

सांगली : पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येकाच्या तोंडात शिवी दिसतेच दिसते. त्यातल्या त्यात सांगली आणि कोल्हापूर म्हटले तर समोरच्याचा उद्धार केल्याशिवाय गप्प राहत नाहीत. या सार्याला वैतागून आता सांगलीला शिवीमुक्त करण्याचा चंग बांधण्यात आला आहे. त्यासाठी निर्माण करण्यात आला आहे, शिवीमुक्त कट्टा. त्यासाठी पुढाकार घेतला आहे मशिद-ए-नमराहने. त्यांनी लावलेल्या फलकाची सांगलीत सध्या जोरदार चर्चा सुरू असल्याचे दिसून येते. (Sangli News)
पश्चिम महाराष्ट्रात शिवीशिवाय काहीजण पाणी देखील पित नाहीत. आमच्याकडे शिवी म्हणजे प्रेम अशी फुशारकी मारण्यात गल्ली बोळात अनेक जण भेटतात. आपल्यातील मैत्री किती घट्ट आहे, हे दाखविण्यासाठी काहीजण बेछूट शिव्या हासडतात. त्यात आईवरुन शिव्यांची यादी तर मोठीच…या सर्व प्रकाराने अस्वस्थ होऊन प्रत्येक धर्मातील तरुणांनी शिवी सोडली पाहिजे. यााठी मशिद-ए- नमराहने 'नेकी की राह पर एक कदम' असे म्हणत शिवीमुक्त कट्टा असा संकल्प केला आहे. (Sangli News)
या फलकावर आईचे महात्म्य सांगणार्या ओळी लिहिण्यात आल्या आहेत. 'प्रचंड वेदना सहन करून आई बाळाला जन्म देते, खूप कष्टाने त्याला सांभाळते, मोठे करते, स्वत: झिजते आणि बाळाला प्रेम देते. त्यामुळे तिच्याबद्दल आदर हवाच, त्यामुळे तिच्यावरून आपण शिवी का द्यावी, असे म्हणत आई आणि बहिणीवरून शिवी न देण्याचा संकल्प करण्याचा संदेश या फलकावर देण्यात आला आहे. त्यामुळे या फलकाची सांगलीत जोरदार चर्चा असून त्याचे कौतुक देखील होत आहे.
हेही वाचा