सांगली : पाणी पेटलेलेच; नेते राजकीय धुळवडीत | पुढारी

सांगली : पाणी पेटलेलेच; नेते राजकीय धुळवडीत

शशिकांत शिंदे

सांगली : लोकसभा, विधानसभा निवडणुकांना अजून अवधी आहे. मात्र जिल्ह्याच्या पूर्व भागात पाण्याच्या प्रश्नावरून आरोप- प्रत्यारोप, आंदोलन याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघत आहे. या प्रश्नावर नेत्यांनी अनेक निवडणुका लढवल्या. सत्ता उपभोगली, मात्र पाणी काही आलेले नाही. त्यामुळे पाण्यासाठी अजून किती दिवस प्रतीक्षा करायची, असा प्रश्न दुष्काळग्रस्त लोकांच्यासमोर आहे.

सांगली जिल्ह्यात यंदा सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या 44 टक्के पाऊस कमी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळचे पाणी काही गावात गेले आहे. अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. काही ठिकाणी पिकांना पाणी तर काही ठिकाणी पिण्यासाठीही पाणी नाही. लोकांच्या जीवन -मरणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा पोळी भाजून घेण्यासाठी नेत्यांची मात्र चढाओढ सुरू आहे.

2002-03 च्या दुष्काळात पूर्व भागातील लोकांनी दिवंगत नेते नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन केले. पुणे येथील विभागीय कार्यालयापर्यंत शेतकर्‍यांनी ठिय्या मारला. त्याला शेतकर्‍यांच्यातून जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर नेत्यांनी या प्रश्नात लक्ष घालण्यास सुरुवात केली. काँग्रेस- राष्ट्रवादीची महाविकास आघाडी, भाजप सेना युती, त्यानंतर महाविकास आघाडी अशी सरकारे सत्तेवर आली. त्यात जिल्ह्यातील नेत्यांना महत्वाची पदेही मिळाली. मात्र पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही.

तासगाव – कवठेमहांकाळ मतदार संघातील पाण्यापासून वंचित असलेल्या गावांसाठी आमदार सुमन पाटील यांनी उपोषण केले. उपोषणाचा इशारा दिल्यानंतर खासदार संजय पाटील यांनी ही नौटंकी असल्याची टीका केली. खासदार पाटील आणि स्व. आर. आर. आबा यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र होता. त्यानंतर मध्यंतरी त्यांच्यात समझोता होत काहीकाळ ते एकत्र आले होते. आता त्यांच्या पुढच्या पिढीतही संघर्ष सुरू झाला आहे.

उंचावर असलेल्या वंचित गावांना पाण्यासाठी टेंभूच्या तिसर्‍या टप्प्यातील विस्तारित योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी अनेक वर्षापासून आहे. आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आल्यानंतर राजकीय श्रेयवाद उफाळून आला आहे. तासगाव तालुक्याचे दोन निवडणुकातील राजकारण हे खासदारही आमचाच आणि आमदारही आमचाच अशा तडजोडीवर होते. दोन्ही गटांनी एकमेकांना मदत केली. त्याचा फटका माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना बसला. त्यामुळे खासदार पाटील यांच्या गटावरील त्यांचा विश्वास उडालेला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत आर. आर. आबांचे पुत्र रोहित पाटील यांना उतरण्याच्या तयारीत आहेत. या जागेवर खासदार पाटील पुत्र प्रभाकर यांना ते उतरवणार, अशी चर्चा आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्व विरोधात असतानाही लोकांच्यातून रोहित पाटील यांना सत्ता मिळवली, मात्र नगरसेवक त्यांना बरोबर राखता आले नाहीत. आता पुन्हा हे दोन्ही गट एकमेकांसमोर आलेत. किरकोळ किरकोळ बाबीमध्ये खासदार विरूध्द आमदार असा संघर्ष दिसत आहे.

पाण्यासाठी नुकतेच आमदार सुमन पाटील, रोहित पाटील यांनी दोन दिवस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. त्याला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर पालकमंत्री सुरेश खाडे, भाजपकडून लोकसभेसाठी चर्चेत असलेले पृथ्वीराज देशमुख, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर या खासदार विरोधी नेत्यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील यांनी तर खासदारांच्यावर हल्लाबोलच केला.

खासदारांनी सत्तेच्या माध्यमातून किती मालमत्ता तयार केल्या, पाण्यासाठी केंद्रातून निधी का नाही आणला, असे सवाल करीत केवळ श्रेय मिळवण्यासाठी आटपाडी, जत येथे नारळ फोडण्यासाठी पुढे-पुढे करीत असल्याचे आरोप केले.

टेंभू योजनेचे श्रेयवादाचे राजकारण तासगाव तालुक्यात सुरू असतानाच खासदारांचे राजकीय विरोधक आमदार बाबर यांनी टेंभू योजनेतील पाणी मान्यतेचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेत बाजी मारली. तिकडे जत तालुक्यातही आमदार विक्रम सावंत व माजी आमदार विलासराव जगताप यांच्यात पाणी प्रश्नावरून आरोप-प्रत्यारोप वाढत आहेत.

सिंचनासाठी पाणी पुरणार का?

गेल्या वर्षी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. कोयना धरणही शंभर टक्के भरले होते. तरी सुद्धा चुकीच्या पाणी देण्याच्या पद्धतीमुळे यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई होती. नदीत उपसा बंदी करण्याची वेळ आली. पाणी योजना सर्व गावात पूर्णक्षमतेने सुरू झाल्यास पाणी पुरणार का, आणि उंचावरील गावात जाणार का, हा प्रश्न आहे.

Back to top button