सांगली : नोकरीच्या आमिषाने 87 लाखांचा गंडा | पुढारी

सांगली : नोकरीच्या आमिषाने 87 लाखांचा गंडा

सांगली, पुढारी वृत्तसेवा : शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातील सहा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सुमारे 87 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी पिता-पुत्राविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

शंकर रामचंद्र पाटील (वय 60) व सौरभ शंकर पाटील (30, विठाईनगर, बालाजीनगर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. फसवणुकीचा प्रकार दि. 5 मार्च 2015 रोजी घडला आहे. अभिषेक खंडागळे (गुलमोहर कॉलनी), पौर्णिमा पवार, पूजा झेंडे (कवलापूर), संग्राम सोनवणे (वल्लभनगर, पुणे), विनायक नागावे, शुभम नागावे व महेश पाटील (सांगली) या सात जणांची फसवणूक झाली आहे.

पाटील पिता-पुत्रांनी 2015 मध्ये या बेरोजगार तरुणांना ‘आमची शासकीय विभागात मोठी ओळख आहे. तुम्हाला नोकरी लाऊ का’, असे सांगितले. तरुणांनी होकार दिला. या बदल्यात त्यांच्याकडून त्यांनी प्रत्येक दहा ते बारा लाख रुपये घेतले. लवकरच विविध विभागात जागा निघणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पैसे देऊन पाच वर्षे होऊन गेली तरी संशयितांनी कुठेच नोकरी लावली नाही. तरुणांनी त्यांच्याकडे विचारणा केला. त्यावेळी उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागले. गेल्या काही दिवसांपासून ते तरुणांचे फोनही उचलत नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणांनी पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र संशयितांना राग आला. त्यांनी या तरुणांना शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यामुळे तरुणांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. अभिषेक खंडागळे याने सर्वांच्यावतीने फिर्याद दिली आहे. संशयितांना अजून अटक केलेली नाही. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button